
मुळशीत चिमुकलीवर ज्येष्ठाकडून बलात्कार
पौड, ता. १५ : नऊ वर्षाच्या चिमुकलीवर वृद्ध नराधमाने बलात्कार करण्याची घटना आंदेशे (ता. मुळशी) येथे घडली. संतोबा वाघू कंधारे (वय ७८, रा. आंदेशे), असे या नराधमाचे नाव असून, त्याला पौड पोलिसांनी अटक केली आहे.
ओरीपी कंधारे याची मुले पुण्यात राहत असून, तो घरी एकटाच राहतो. त्याने या मुलीला कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे या खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवले व गोड बोलून तिच्यावर बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पौड पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे पुढील तपास करीत आहे.
या घटनेचा विविध स्तरातून निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले यांनी पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. यावेळी राणी शिंदे, संतोषी मारणे, कावेरी साठे, वैशाली शिंदे आदी उपस्थित होत्या. तालुका रिप्बलिन पक्षाच्या आठवले गटाच्यावतीने तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष गोविंद निकाळजे, कार्याध्यक्ष अशोक कांबळे, श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश केदारी, सचिव आनंद रोकडे, उपाध्यक्ष दशरथ गायकवाड, युवक अध्यक्ष नीलेश आल्हाट, शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्यावतीनेही या घटनेचा निषेध केला. पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनावेळी अध्यक्ष प्रशांत कांबळे, महासचिव अशोक ओव्हाळ आदि उपस्थित होते.