
खड्ड्यांमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा ताप
लोगो- मुळशीकरांच्या मृत्यूचा सापळा
पौड, ता. २७ : अर्धवट एकेरी रस्ते व खड्ड्यांच्या चाळणीमुळे मुळशीच्या राष्ट्रीय महामार्गावर मानवनिर्मित वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. भूगाव, पिरंगुट, घोटवडे फाटा, पौड ही ठिकाणे म्हणजे वाहतूक कोंडीचे ‘ब्लॅक स्पॉट’ झाले आहेत. अरुंद रस्ता, लग्नसमारंभाच्या काळातील वाहनांची गर्दी, वाहतूक नियम धाब्यावर बसवून चाललेली बेशिस्त वाहतूक, यामुळे मुळशीतून पुण्याकडे ये-जा करणाऱ्या चाकरमंडळीसह स्थानिकांनाही एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन तीन तास तिष्ठत थांबावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार, हा प्रश्न स्थानिकांसह प्रवाशांना पडला आहे.
घोटवडे फाटा हा तालुक्यातील वाहतुकीचा राजधानी चौक झाला आहे. हिंजवडी, रिहे खोरे, मुळशी, कोकण, मुठा, लवासा आणि पुण्यातून मुळशीकडे येणारी सर्व वाहने या चौकात येत असतात. या मुख्य चौकातच खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे येथे वाहतूक संथ गतीने होते. परिणामी वाहतूक कोंडी सातत्याने होत असते.
पिरंगुट ओढ्यावरील पुलाच्या कामालाही अजिबात हात लावलेला नाही. या पुलावर सध्या मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे भूगाव आणि पौड येथील बाह्यवळण मार्गाचे काम अद्यापही लालफितीतच पडून आहेत. अरुंद रस्त्यांमुळे भूगाव आणि पौडला वाहतूक कोंडी होत असते. मंगळवारी तर पौडला दिवसभर वाहतूक कोंडीला प्रवाशांना तोंड द्यावे लागते.
भूगाव येथील ओढ्यावर वर्षभरापूर्वी पूल बांधण्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले होते. रस्ता रुंदीकरणासाठी एका बाजूला ओढ्यामध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे बांधकाम केले आहे. त्यातून लोखंडी सळया वर आल्या आहेत. परंतु, अर्धवट अवस्थेत हे काम तसेच पडून आहे. येथील अर्धवट बांधलेला पूल पूर्ण होण्याच्या अगोदरच खचला आहे. पुलाला एका बाजूने भगदाड पडले आहे. लोखंडी सळया गंजून गेल्या आहेत. येथे रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीला इथूनच प्रांरभ होतो. त्यात काही दुचाकी, चारचाकी चालक दुसऱ्यांचा विचार न करता वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवून कशाही पद्धतीने वाहन चालवीत असल्याने वाहतूक कोंडीत अजूनच भर पडते.
भूगाव, पौडला बाह्यवळण गरजेचे
सध्या लग्नसराई सुरू आहे. भूगाव, भुकूम येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या मंगल कार्यालयात लग्नाच्या निमित्ताने वधूवरांकडील वऱ्हाडी मंडळींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून हजेरी लावत असतात. यातील बहुतेक मंडळी चारचाकी वाहनातून प्रवास करीत असतात. त्यामुळे भूगाव, घोटवडे फाटा, पिरंगुट येथे मेगा वाहतूक कोंडी पहावयास मिळते. भूगाव आणि पौडच्या बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीतून स्थानिकांसह, चाकरमान्यांची सुटका होईल. तोपर्यंत मात्र तासनतास रस्त्यात तिष्ठत अडकण्याची नामुष्की मुळशीकरांना सहन करावी लागणार आहे. भूगावला वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गावातील काही युवकही सामाजिक बांधिलकीतून रस्त्यावर उतरताना दिसतात.
अरुंद रस्ता आणि वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्याच्या कडेने चालणेही धोकादायक होऊ लागले आहे. भूगाव, पौड या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. जिथे रस्ता झाला नाही, तेथील खड्डे तात्पुरते डांबराने बुजविल्यास वाहतूक कोंडीतून काही काळासाठी तरी सुटका होऊ शकेन.
- दत्तात्रेय तारू, रहिवासी, भूगाव (ता. मुळशी)