
वेताळे येथील विद्यार्थी आठवणींनी भारावले
राजगुरुनगर, ता. ११ : खेड तालुक्यातील वेताळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयातील १९८२-८३च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी, शिक्षकांसह तब्बल चार दशकांनी, राजगुरूनगरजवळ एका खासगी हॉटेलात आयोजित स्नेहमेळाव्यात नुकतेच भेटले.
अनेक वर्षानंतर भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रथम गुरुजनांना व मित्रांना आपला परिचय करून दिला. त्यानंतर चर्चेत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. साठीकडे झुकलेले विद्यार्थी व सत्तरी पार केलेले गुरुजन आठवणींनी भारावून गेले. चार दशकानंतरही विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी जपून ठेवल्याचे पाहून गुरुजनांही कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. ठोके होते. वेताळेच्या सरपंच सविता बोंबले, दत्तू बोंबले, डी. बी. बोंबले, चंद्रहार बोंबले, विठ्ठल धर्मा बोंबले, गुलाब बोंबले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास एस. डी. पवार, एस. के. कर्णे, जे. एल. चव्हाण, एस. एन. चौगुले, एस. जी. तोडकर, एम. एल. वाव्हळ, ए. ए. मणेर, डी. एम. गावडे आदी शिक्षक व चंद्रकांत मोरे (मामा) सपत्नीक उपस्थित होते.
सेवानिवृत्त झाल्याबद्दल सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर माने यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व विद्यार्थी बी. के. कदम लिखित ''इरसाल गावटगे'' कादंबरी देवून उपस्थित गुरुवर्यांचा तर पैठणी देऊन गुरुमातांचा सन्मान करण्यात आला. बाबाजी वाळुंज, बाळासाहेब नाईकडे, सुनील तनपुरे, सुभाष बोंबले, साहेबराव शेलार, नामदेव पाषाणकर, राजू शिंदे, दिनेश बोंबले, ज्ञानेश्वर बोंबले आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड तालुका पोलिस पाटील संघाचे उपाध्यक्ष सयाजी शिंदे पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य बी. के. कदम यांनी केले. आभार ॲड. संभाजी मिंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत गुरुजन, गुरुमाता, वर्गमित्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तब्बल बारापेक्षा जास्त वर्गमित्र गमावल्याने सभागृहात भावुक वातावरण झाले.
Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01136 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..