शिरूरचा मूळ शिवसैनिक जागेवरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरचा मूळ शिवसैनिक जागेवरच
शिरूरचा मूळ शिवसैनिक जागेवरच

शिरूरचा मूळ शिवसैनिक जागेवरच

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ३० : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल. काही तुरळक लोक जरी इकडेतिकडे गेली असतील; तरी मूळ शिवसैनिक जागेवरच आहे. शिवसेना हा मोठा प्रवाह आहे, त्यात छोटीमोठी वळणे, चढउतार आले तरी प्रवाह पुन्हा सुरूच राहतो. येथे गावागावात शाखा आहे. तेथे काम करणारा शिवसैनिक हललेला नाही,’’ असा दावा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.
राजगुरुनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, स्वाती ढमाले, गणेश सांडभोर आदी उपस्थित होते. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘शिरूरमध्ये पूर्वी परिवर्तन बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातूनच झाले होते. काहीही मिळवायचा नसणारा त्यागी निष्ठावान शिवसैनिक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही. त्यामुळे या मतदारसंघात काही पोकळी वगैरे आम्हाला जाणवत नाही. उलट मुक्तता अनुभवत असल्याने कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत.’’
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीमुळे चांगले ऋणानुबंध जुळलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगला संपर्क आहे. पण, भविष्यातील निवडणुका बरोबरीने लढण्याबाबत काय परिस्थिती राहील, यावर आता भाष्य करणे योग्य नाही. पक्षप्रमुख त्यावेळी योग्य तो निर्णय घेतील. मात्र, शिवसेनेच्या सगळ्या जागा कोणाला देऊन टाकणार, असे काही होणार नाही. शिवसेनेकडे अनेक सक्षम नेते, पदाधिकारी आहेत. अनेकजण शिवसेनेत येण्यासाठीही इच्छुक आहेत,’’ असे गोऱ्हे यांनी सांगितले.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मित्रपक्ष आणि संघटना यांना बरोबर घेऊन, त्यांच्याशी स्थानिक शिवसैनिकांचा समन्वय कसा होतो, ते पाहून निर्णय घेतला जाईल. मात्र, सत्तेसाठी कोणाबरोबर फरफटतही आम्ही जाणार नाही. आत्मसन्मान राखून जे काही बेरजेचे राजकारण करावे लागेल, तो निर्णय पक्षप्रमुख घेतील आणि कार्यकर्तेही त्याबाबत सहकार्य करतील. शिवसेनेच्या मेळाव्याला गर्दी जमवावी लागत नाही, ती आपोआप होते. इतरांना प्रयत्न करावे लागतात, ते करणे त्यांचे काम आहे.
नीलम गोऱ्हे,
उपसभापती, विधान परिषद