राजगुरुनगरमधील अतिक्रमणांवर अखेर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगरमधील अतिक्रमणांवर अखेर कारवाई
राजगुरुनगरमधील अतिक्रमणांवर अखेर कारवाई

राजगुरुनगरमधील अतिक्रमणांवर अखेर कारवाई

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १ : राजगुरुनगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करीत प्रशासनाने वाडा रस्ता, पाबळ रस्ता आणि जुना मोटार स्टँड परिसरातील कच्ची बांधकामे, टपऱ्या, पत्र्याचे शेड, फलक आदी अतिक्रमणे गुरुवारी व शुक्रवारी काढून टाकली. रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, खाद्यपदार्थाच्या हातगाड्या, किरकोळ विक्रीचे स्टॉल्स, फळ व फुलविक्रेते, पथारीधारक आदी रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या कच्च्या अतिक्रमणांवर कारवाई केली.
राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावर २२ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टरच्या धक्का दुचाकीला बसल्याने दुचाकीवर मागे बसलेली आई सहा महिन्याच्या मुलीसह खाली पडली आणि मुलगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच मरण पावली. या घटनेचे जोरदार पडसाद गावात उमटले होते. ‘आम्ही राजगुरूनगरकर’ या ग्रुपने वाहतूक कोंडी व वाडा रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच, भीमशक्ती संघटनेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता.
सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि नगरपरिषद प्रशासनाने संयुक्तपणे पोलीस बंदोबस्तात या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून टाकली. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली. त्यात आधी वाडा रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. महात्मा गांधी विद्यालयालगत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. शुक्रवारी पाबळ रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेकांनी कारवाईअगोदरच आपली साहित्य सामुग्री हलविली होती.
तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता डी. एच. दराडे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांसह अनेक अधिकारी कारवाईच्या प्रसंगी उपस्थित होते. तसेच, ‘आम्ही राजगुरूनगरकर’ या ग्रुपचे सदस्य आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.