
वाघमारे, बोकील यांना ढसाळ पुरस्कार
राजगुरुनगर, ता. ४ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर (ता. खेड) शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कारांच्या गेल्या दोन वर्षांच्या विजेत्या काव्यसंग्रहांची घोषणा नुकतीच शाखाध्यक्ष संतोष गाढवे यांनी केली. ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ या डॉ. सुभाष वाघमारे यांच्या कवितासंग्रहास सन २०२१चा आणि ‘हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात’ या संजीवनी बोकील यांच्या कवितासंग्रहास सन २०२२चा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रभरातून १५० काव्यसंग्रह परीक्षणासाठी आले होते. त्यातून दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी पाच संग्रह परीक्षणातून पुरस्कारांसाठी निवडण्यात आले. रोख रक्कम, मानपत्र शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व ज्येष्ठ साहित्यप्रेमी नेते उल्हास पवार यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे गाढवे यांनी सांगितले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे (कवितासंग्रह, कवीचे नाव व गाव या क्रमाने) : वर्ष २०२१ : प्रथम : संविधानाच्या स्वप्नातलं गाव - डॉ. सुभाष वाघमारे, सातारा. द्वितीय : स्त्री कुसाच्या कविता- प्रा. लक्ष्मण महाडीक, नाशिक. तृतीय : परिवहन परिभ्रमण- संदीप धावडे, अमरावती. चतुर्थ : कुरकूल- उत्तम सावंत, सांगली. पंचम : मल्हार धून- माधुरी विधाटे, चिंचवड. वर्ष २०२२ : प्रथम : हिरव्या सुक्तांच्या प्रदेशात- संजीवनी बोकील, पुणे. द्वितीय : घामाची ओल धरून- आबा पाटील, बेळगाव. तृतीय : आडतासाच्या कविता- श्रीकांत ढेरंगे, संगमनेर. चतुर्थ : भुई आणि बाई- प्रवीण पवार, धुळे, पंचम : नाती वांझ होताना- मनीषा पाटील, सांगली.