सतारकावस्तीतील शिक्षकांना दोन दुचाकी बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतारकावस्तीतील शिक्षकांना दोन दुचाकी बक्षीस
सतारकावस्तीतील शिक्षकांना दोन दुचाकी बक्षीस

सतारकावस्तीतील शिक्षकांना दोन दुचाकी बक्षीस

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. ६ : खेड तालुक्यातील रेटवडीच्या सतारकावस्ती शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळविल्याबद्दल पालक व ग्रामस्थांनी शिक्षकांना दोन दुचाकींचे बक्षीस दिले.
सतारकावस्ती येथील मुले १९९१ पासून शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा आणि राज्य स्तरावर झळकत आहेत. आत्तापर्यंत शाळेचे २१८ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक ठरले असून दहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झाळकले आहेत. यावर्षी दोन विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत व १२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या यशाबद्दल पालक व ग्रामस्थांनी वर्गशिक्षक सोपान मांजरे व अस्मिता वाकचौरे यांना प्रजासत्ताकदिनी दोन दुचाकी भेट देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनाही विविध प्रकारचे शालोपयोगी साहित्य देण्यात आले. जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त प्रणोती गावडे यांनाही गौरवण्यात आले.

बक्षीस वितरणासाठी अभिनेत्री प्राजक्ता खोल्लम, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे, बाबाजी काळे, विजया शिंदे, गणेश थिगळे, रेटवडीच्या सरपंच माया थिटे, उपसरपंच दिलीप डुबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुगुटराव मोरे यांनी केले, तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.


सतारकावस्तीतील ग्रामस्थ गेल्या दहा वर्षांपासून शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देतात. आत्तापर्यंत शिक्षकांना एक चारचाकी, सात दुचाकी, दोन लॅपटॉप व पाच सुवर्ण मुद्रा देण्यात आल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना ७२ घड्याळे, स्टडी टेबल व विविध प्रकारचे शालोपयोगी साहित्य देण्यात आलेले आहे. येथील ग्रामस्थ व कर सल्लागार गुलाबराव पवळे यांच्याकडून प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
- सोपान मांजरे, मुख्याध्यापक

02312