
शाखा अभियंता शिंदे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू
राजगुरुनगर, ता. १५ : खेड तालुक्याच्या वाकळवाडी येथील कथित बोगस सभामंडप प्रकरणातील जिल्हा परिषद बांधकाम खात्यातील शाखा अभियंता बापूसाहेब शेषराव शिंदे हे मंगळवारी (ता. १४) बहिरवाडी (ता. खेड) येथे झोपलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे, असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
वाकळवाडी येथे एका सभामंडप शेडचे काम तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्षात ते काम झाले नाही आणि ठेकेदाराने त्याचे बिल काढून घेतले. काही ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठविल्यावर घाईघाईत दोन दिवसांत कसेबसे शेड उभे केले. हे समजल्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजेश जवळेकर यांनी त्या कामाची पाहणी केली आणि या कामात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केला. त्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि कामाची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची नव्हे; तर प्रशासनाची असल्याचे स्पष्ट केले. तिला जोरदार प्रत्त्युत्तर देताना आढळराव पाटील यांनी जिल्हा परिषदेकडून झालेल्या कामांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. हे सभामंडपाचे काम शाखा अभियंता बापूसाहेब शिंदे यांच्या कार्यकक्षेतील होते. या प्रकरणामुळे ते तणावात होते. ते मंगळवारी (ता. १४) सकाळी मित्राची चारचाकी घेऊन बाहेर पडले. मंगळवारीही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. रात्री बुट्टेवाडी परिसरातील रानात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे.