राजगुरुनगरला फ्लेक्सबाबत अनागोंदी कारभार

राजगुरुनगरला फ्लेक्सबाबत अनागोंदी कारभार

राजगुरुनगर, ता. १८ : राजगुरुनगरमध्ये सर्व फ्लेक्स अनधिकृतपणे लावलेले आहेत. फ्लेक्स लावण्याला काहीही नियम, कायदे नाहीत. नगरपरिषद या फ्लेक्स लावणाऱ्यांवर काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे अधिकारी आणि फ्लेक्स चालकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे. मात्र या अनागोंदी कारभारामुळे राजगुरुनगरमध्ये कधीही दुर्घटना घडू शकेल, अशी परिस्थिती आहे.
कुणीही कुठेही बिनदिक्कतपणे फ्लेक्स लावते. सरकारी कार्यालयांबाहेरही बेलगामपणे फ्लेक्स लावले जातात. पंचायत समिती तर फ्लेक्सनीच झाकलेली असते. उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, तहसीलदार कार्यालय इत्यादी सर्व कार्यालयांच्या परिसरात फ्लेक्स आहेत. शिवाय ते बेकायदा आहेत. पण कोणतेही कार्यालय अथवा नगरपरिषद त्यांच्यावर कारवाई करत नाही. अधिकाऱ्यांची आणि फ्लेक्स चालकांची मिलीभगत असल्याची चर्चा असून त्यामुळे अधिकारी गप्प असतात, असे बोलले जाते.
पुणे-नाशिक महामार्ग, टोलनाका तसेच परिसरातील मोठ्या रस्त्यांच्या कडेला अवजड होर्डिंग्ज उभारलेली आहेत. त्यांना परवानग्या नाहीत. रस्त्याकडेच्या जागामालकाला वार्षिक भाडे देऊन जागा भाड्याने घेतली जाते आणि ती उभारली जातात. त्यांच्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
राजगुरूनगर बस स्थानकासमोर फ्लेक्सच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. या परिसरात हजारो लोक ये जा करत असतात. एखादाही फ्लेक्स कोसळला, तर जीवितहानीचा धोका आहे, पण त्याची कोणीही पर्वा करताना दिसत नाही. तसेच शाळांच्या परिसरातही फ्लेक्स उभारलेले आहेत. तेथेही विद्यार्थ्यांना धोका आहे, पण कोणाला काळजी नाही. याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.


02427

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com