खेड बाजार समितीच्या सभापतिपदी लिंभोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड बाजार समितीच्या सभापतिपदी लिंभोरे
खेड बाजार समितीच्या सभापतिपदी लिंभोरे

खेड बाजार समितीच्या सभापतिपदी लिंभोरे

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २४ : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कैलास लिंभोरे,
तर उपसभापतिपदी विठ्ठल वनघरे हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी जाहीर केले.
नुकत्याच झालेल्या खेड बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलचे बहुमत आले होते. भीमाशंकर पॅनेलचे १० संचालक निवडून आले होते. व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेल्या महेंद्र गोरे यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती या पॅनेलचे होणार, हे निश्चित होते. फक्त नावांबाबत उत्सुकता होती. बाजार समितीच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक झाली. सभापती व उपसभापतिपदासाठी अनुक्रमे लिंभोरे व वनघरे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, सर्वपक्षीय पुरस्कृत पॅनेलच्या वतीने विजय शिंदे यांनी सभापतिपदासाठी व सुधीर भोमाळे यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले. त्यानंतर गुप्त मतदान झाले. मतमोजणीत लिंभोरे व वनघरे यांना ११ आणि शिंदे व भोमाळे यांना ७ मते मिळाली. त्यामुळे लिंभोरे व वनघरे अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे, संचालक आमदार दिलीप मोहिते, अशोक राक्षे, हनुमंत कड, विनोद टोपे, जयसिंग भोगाडे, रणजित गाडे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे, कमल कड आणि सर्वपक्षीय पुरस्कृत पॅनेलचे सागर मुऱ्हे, माणिक गोरे, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, क्रांती सोमवंशी हे सभागृहात उपस्थित होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक दिगंबर दुर्गाडे, कैलास सांडभोर, सुरेखा मोहिते, अरुण चांभारे, अनिलबाबा राक्षे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार मोहिते म्हणाले, ‘‘खेड कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील एक आदर्श बाजार समिती करण्यासाठी आणि बाजार समितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी प्रयत्न करावेत. सर्व कामकाजामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करेन.’’

मोहिते यांनी मांडली खंत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलचे सर्व संचालक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी सभापतिपदासाठी एकमुखाने आमदार मोहिते यांची शिफारस करूनही त्यांनी सभापती होण्यास नकार दिला, असे निरीक्षक दुर्गाडे यांनी सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा संच असतानाही मला कमी मते मिळणे, हा मी माझा पराभवच समजतो, अशी खंत आमदार मोहिते यांनी बोलून दाखविली. मी सभापतिपद स्वीकारणार नसल्यावर ठाम आहे, असेही ते म्हणाले.