
विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण
रांजणगाव सांडस, ता.१५ : महावितरणतर्फे तीन आठवड्यापासून थ्री फेज आणि सिंगल फेज दिवस रात्र अनियमित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे आरणगाव (ता.शिरूर) परिसरात विजेचा लपंडावामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. भीमा नदीला भरपूर पाणी उपलब्ध असूनही विजे अभावी भर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके, तरकारी, फळे, ऊस, फूल शेतीला फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या दुपारच्या वेळी उन्हापासून सुटका व्हावी यासाठी ग्रामस्थ घरीच विश्रांतीसाठी थांबत आहेत. वीज नसल्याने पंखे फिरत नसल्याने उकाड्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रात्रीही पंखे फिरत नसल्याने उकाडा भरपूर जाणून डासांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांची पुरेशी झोप होत नाही. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी आठ तासातील खूपच कमी वेळ वीजपुरवठा होत आहे. विजेअभावी पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने भीमा नदीला पाणीसाठा उपलब्ध असून देखील पिके जळून जात आहे.
आमदार ॲड.अशोक पवार यांनी जलसंपदा विभागाकडे सततचा पाठपुरावा केल्याने शिरूर तालुक्यातील भीमा नदीवरील भर उन्हाळ्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले आहे. त्यामुळे पाणीसाठा समाधानकारक उपलब्ध आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी चारा पिके, उन्हाळी भुईमूग, तरकारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहे. त्याचबरोबर सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे गुलछडी, झेंडू आदी फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळत असतो.मात्र विजेच्या सततच्या लपंडावामुळे पाणी न मिळाल्याने तरकारीसह, फूल शेती सुकून जात आहे . तसेच चारा पिके, ऊस,उन्हाळी भुईमूग आदि पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महावितरण येथील कामाबाबत अडचणी दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील रहिवासी पोलिस पाटील संतोष लेंडे, माजी उपसरपंच राजेंद्र मखर, शुभम तोंडे, आबासाहेब ठोंबरे, शंकर ठोंबरे, संतोष भालेराव, दादा खेडकर आदींनी केली आहे.
पिके नष्ट होण्याची भीती
आरणगाव परिसराला दौंड तालुक्यातून वीज पुरवठा सुरू होता. तो बंद करून शिरूर तालुक्यातून वीजपुरवठा सुरू केला आहे. वीज सुरू राहण्याच्या वेळेपेक्षा वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. अगदी पाच पाच मिनिटाला विजेचा लपंडाव चालू आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतातील सर्व पिके विजे अभावी नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने दूध खराब होऊन नुकसान होत आहे. यामुळे ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.
- संतोष लेंडे. दूध व्यावसायिक, आरणगाव
उन्हाळ्यामुळे तापमान वाढत असल्याने विजेची मागणी अधिक आहे. तीव्र उन्हामुळे तांत्रिक बिघाड होऊन विजेच्या लपंडाव सुरू होतो. मात्र, उष्णता कमी झाल्यावर लपंडाव थांबेल. नागरिकांच्या विजेच्या अडचणी वरिष्ठांशी बोलून कमी करण्यात येईल.
दीपक पाचुंदकर, सहायक अभियंता, रांजणगाव गणपती
02110