
कानसे येथे बिबट्या जेरबंद
शिनोली, ता. ८ : कानसे (ता. आंबेगाव) येथे लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. ८) पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी दिली.
येथील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर मागील सहा ते सात दिवसांपासून बिबट्याने हल्ले केले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी कानसे परिसरात पिंजरे लावले होते. परंतु, बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. गजानन चिमाजी वाळुंज यांच्या घराजवळ वनविभागाने पिंजरा लावला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची त्यांना दिसले. यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती कळवली. पाळीव जनावरांवर हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का, हे मात्र स्पष्ट झाले नाही, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. बिबट्या मादी जातीचा आहे. त्याचे वय चार वर्षाचे आहे. त्आला माणिकडोह येथील केंद्रात बिबट्या निवारण केंद्र सुखरूप दाखल केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, एम. बी. गारगोटे, वनपरिमंडळ अधिकारी, पी. पी. लांघी, वनरक्षक. ए. एच. घोडे, एन. टी. दळवी, एस. आर. सुपे, विलास भालेराव, संजय उतले व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.