
इंदापुरात सीएनजी पंपावर वाहनधारक गॅसवर
संतोष आटोळे-सकाळ वृत्तसेवा
-----------------
इंदापूर, ता. ५ ः पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकांनी सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांना पसंती दिली असली, तरी हा गॅस भरण्यासाठी इंदापूर येथील सीएनजी पंपावर व्यवस्थापनाचे योग्य नियोजन नसल्याने अशा वाहनधारकांना पंपावर तासन् तास रांगेत ताटकळत राहण्याची वेळ येत आहे. यामधून वाहनचालक त्रस्त आहेत. यामुळे ‘गॅसवरचे वाहन सध्या तरी नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
इंदापूरलगत पुणे- सोलापूर महामार्गावर सरडेवाडी गावच्या हद्दीत सीएनजी पंप कार्यान्वित आहे. पुणे आणि सोलापूर या शहरातून निघणाऱ्या सीएनजीधारक वाहन चालकांसाठी हा पंप अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. यामुळे या पंपावर वाहनांची सतत वर्दळ असते, परंतु सीएनजी पंपावर कंपनी व्यवस्थापनाकडून योग्य प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत नसल्याने सीएनजी गॅस असतानाही वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
या ठिकाणी सीएनजीचे दोन पॉइंट आहेत मात्र दोन्हीही पॉइंटवर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने एकच पॉइंट चालू ठेवला जातो. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत अनेकांना ताटकळत राहावे लागत आहे. वाहनांच्या रांगा पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येत वाहतुकीलाही अनेक वेळा अडथळा निर्माण होत आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
----------------
सीएनजी पंपांची संख्या वाढवणे गरजेचे
----------------------------
इंदापूर हे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती शहर आहे, तसेच या भागातही सीएनजी वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहर व परिसरात अजून एक, दोन सीएनजी पंपाची आवश्यकता असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
-----------
ऑनलाइन पेमेंटला नकार
-------------
एकीकडे भारत सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारावर भर देत आहे, परंतु इंदापुरातील सीएनजी पंपावर मात्र ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले जाते. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे, तर अनेक वेळा वादाचे प्रसंग घडत आहेत.
------------------------
Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b00927 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..