
इंदापुरात बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई
इंदापूर, ता.१२ : इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर महाविद्यालयाच्या शनिवारी (ता.१०) दुपारी सानिका राजेंद्र लिके या युवतीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. यामुळे पोलिस प्रशासन जागे झाले. यामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी रविवारी (ता.११) पोलिसांनी महामार्ग लगतच्या बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली. पण एका दिवसापुरत्या कारवाईवरच न थांबता यावर सार्वजनिक बांधकाम खाते नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी इंदापूरकरांकडून होत आहे.
इंदापूर शहरातील आठवडे बाजारच्या निमित्ताने कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, नारायणदास हायस्कूल समोरील व बस स्थानक परिसरातील बेकायदेशीररीत्या पार्किंग केलेल्या मोटरसायकली सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोकादायक निर्माण होईल, अशा अवस्थेत मिळून आल्याने इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर व त्यांच्या पथकाने जप्त करून पुढील कार्यवाही केली.
इंदापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक, बेशिस्त पार्किंग या विरोधात अनेकवेळा आवाज उठवूनही कोणतीही ठोस कार्यवाही केली गेली नाही. यामुळेच निष्पाप सानिकाचा बळी गेल्याचे इंदापुरवासीय बोलत आहेत. बळी गेल्यानंतर इंदापूर शहरात बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
02530