उपसरपंचांच्या निवडीला वंजारवाडीमध्ये आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचांच्या निवडीला
वंजारवाडीमध्ये आक्षेप
उपसरपंचांच्या निवडीला वंजारवाडीमध्ये आक्षेप

उपसरपंचांच्या निवडीला वंजारवाडीमध्ये आक्षेप

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. १५ : वंजारवाडी (ता. बारामती) येथे गुरुवारी (ता. १५) झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर विद्यमान पाच सदस्यांनी आक्षेप घेऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक नीलेश लवटे यांनी निवडणूक प्रक्रियेत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने सदस्यांनी व ग्रामस्थांनी पंचायत समिती येथे त्यांचा निषेध करून वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
वंजारवाडी येथील उपसरपंचपदाच्या निवडीची प्रकिया सुरू असताना, ‘मला या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही,’ असे सांगून एक सदस्य वैयक्तिक कारणास्तव सभेतून निघून गेले. त्यावर एका सदस्याने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर विनोद चौधर यांनी ग्रामसेवक लवटे यांना सांगितले की, नियमानुसार निवडणूक प्रक्रियेला लागणारी सदस्यांची संख्या पूर्ण असल्याने मतदान प्रक्रियेला स्थगिती देता येत नाही. यावर लवटे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेऊन गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी सर्व सदस्यांसमोर स्पीकर चालू करून माहिती दिली. त्यावर बागल यांनी सांगितले की, सदस्य संख्या पूर्ण असल्यास मतदान प्रक्रिया थांबवता येत नसून, तुम्ही तत्काळ निवडणूक प्रक्रिया चालू करा. परंतु, लवटे यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता मनमानी कारभार करून एक तास पाच मिनिटे निवडणूक प्रक्रिया थांबवून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

नियमानुसार सदस्य संख्या पूर्ण असल्यास उपस्थित असणाऱ्या सदस्यांमध्ये मतदान प्रक्रिया घेणे आवश्यक आहे. तसेच, वरिष्ठांनी देखील मतदान प्रक्रिया घेण्याची सूचना केल्या असताना देखील सरपंचांच्या दबावामुळे विलंब करून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता उपसरपंच निवड बेकायदेशीरपणे केली. त्यामुळे ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करून उपसरपंच निवड प्रक्रिया पुन्हा घ्यावी.
- विनोद चौधर, ग्रामपंचायत सदस्य, वंजारवाडी

मी कोणताही विलंब न करता वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून नियमानुसार निवडणूक प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडली आहे.
- नीलेश लवटे, ग्रामसेवक, वंजारवाडी