गावकारी ठरवणारा कौल मतदानयंत्रात बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावकारी ठरवणारा कौल मतदानयंत्रात बंद!
गावकारी ठरवणारा कौल मतदानयंत्रात बंद!

गावकारी ठरवणारा कौल मतदानयंत्रात बंद!

sakal_logo
By

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १५ : पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता १७६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान प्रक्रिया झाली. काही ग्रामपंचायतींमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली. यामध्ये एकूण ३ लाख ३ हजार २१३ मतदारांपैकी २ लाख ४५ हजार १९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये एकूण ८०.८६ टक्के मतदान झाले.
पुणे जिल्ह्यातील डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. त्यामध्ये ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर, ५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. १६७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी व एकूण १७६ ग्रामपंचायतीसाठी ६५१ मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १८५३ सदस्यपदाच्या जागांपैकी ७१२ जागा बिनविरोध झाल्या, तर ७९ सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे उर्वरित १०६२ जागांसाठी मतदान झाले.
ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडाला होता. दिवस रात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ऐन गुलाबी थंडीत राजकारण तापले होते. उमेदवारांचे मतदानरूपी भविष्य ईव्हीएम मशिनमध्ये बंदीस्त झाले आहे. निकालासाठी उमेदवारांना एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतमोजणी मंगळवारी (ता. २०) होणार असल्याने उमेदवारांची व मतदारांची उत्सुकता एक दिवस कायम जाणार आहे. मतमोजणी प्रत्येक तालुकास्तरावर केली जाणार आहे.

तालुका, मतदान झालेल्या ग्रामपंचायती, एकूण मतदार, झालेले मतदान - टक्केवारी
वेल्हे - २५ - १५१४८ - १२७४५ - ८४.९०
भोर - ३० - २२९१०- १९९४२ - ८५.०८
दौंड - ८ - १५४४६ - १२९६६ - ८३.९४
बारामती - १३ - ३७०२३- ३१४४२ - ८४.९३
इंदापूर - २६ - ५७७६० - ४८३५१ - ८३.७१
जुन्नर - १३ - १९४५६ - १६६५७ - ८३.५२
आंबेगाव - १६ - ४१५३६ - ३१५२३ - ७५.८९
खेड - २१ - २५६०१ -१८३८१ - ७२.११
शिरूर - ४ - १३५२३ -११३६८ - ७२.११
मावळ - ८ - १४५७७ - ११६३२ - ७९.८०
मुळशी - ५ - २३०६ - १९७९ - ८५.८२
हवेली - ७ - ३७९२३ - २८६५७ - ७५.५६
एकूण - १७६ - ३०३२१३ - २४५१९३ - ८०.८६