Tue, Feb 7, 2023

अगोती येथे ट्रॉली उलटून
सहा ऊस कामगार जखमी
अगोती येथे ट्रॉली उलटून सहा ऊस कामगार जखमी
Published on : 24 December 2022, 1:49 am
इंदापूर, ता. २४ : अगोती नंबर एक (ता. इंदापूर) येथे उसाची ट्रॉली पलटी होऊन सहा ऊस तोडणी कामगार जखमी झाले. त्यांच्यावर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तोडलेला ऊस ट्रॉलीमध्ये भरून शनिवार (ता. २४) सकाळी एक ट्रॅक्टर दुसऱ्या क्षेत्रात नेत असताना बाजूच्या दगडावर चाक गेल्याने ट्रॉली उलटली. या ट्रॉलीमध्ये भरलेल्या उसावर सहा ऊस तोडणी कामगार बसले होते. ते खाली पडून त्यांच्यावरून उसाच्या मोळ्या पडल्या. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यांचे मूळ गाव नंदूरबार जिल्ह्यातील असल्याचे समजते. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत.
दरम्यान, स्थानिक नागरिक, शेतकरी यांनी संबंधित जखमी मजुरांना तेथून बाहेर काढत इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.