
यूट्यूब चॅनेलवर बदनामीप्रकरणी इंदापुरात दोघांवर गुन्हा दाखल
इंदापूर, ता. १ : अंगणवाडी सेविका, कर्मचारी व मदतनीस यांच्या मोर्चाचा हवाला देत एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याविरुद्ध बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित करून आणखी बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे मागितल्याच्या कारणावरून इंदापूर येथील एका यूट्यूब चॅनेलच्या तथाकथित पत्रकारासह अन्य एकावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कनिष्ठ सहायक शिरीष सुभाष काळे (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाचे कार्यालय भिगवण येथून इंदापूर येथे स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका कर्मचारी व मदतनीस यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी पंचायत समिती इंदापूर येथे उपोषण केले. यावेळी यातील एका आरोपीने फिर्यादी शिरीष काळे यांच्यासह सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी विलास बंडगर, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ यांच्यावर बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप करत व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामुळे आरोप करणारे व ज्या यूट्यूब चॅनेलवर हे प्रसिद्ध झाले, त्याच्या पत्रकारांना नोटीस बजावली होती. ती मागे घ्यावी म्हणून दोन्ही आरोपी हे फिर्यादींवर वारंवार दबाव आणून बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पैसे मागत होते. याबाबत फिर्याद दिल्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीस अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सरकारी वकील विकास घनवट यांनी दिली.