
इंदापूरकरांचा रविवार ठरला राजकीय रंगपंचमीचा
इंदापूर, ता. १२ : इंदापूरकरांना रविवारी (ता. १२) रंगपंचमीच्या दिवशी विविध राजकीय पक्षांची भूमिका पाहायला मिळाली.
यामध्ये सकाळी धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने आयोजित बैठकीत परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी पक्षविरहित राजकीय भूमिका मांडताना धनगर समाजासाठी निधी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असताना भाजपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. जो पक्ष आमच्या समाजाला जास्तीत जास्त संधी देईल, त्यांच्या पाठीमागे समाजाने उभा राहण्याचे आव्हान त्यांनी केले.
त्यानंतर काही वेळातच शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत इंदापूरमध्ये आजी-माजी आमदारांना लोक कंटाळले असून, तिसरा सक्षम पर्याय देण्याची घोषणा करत इंदापूर तालुक्यात शिवसेना-भाजप युती होणार का? अशी शंका इंदापूरकरांच्या मनात उपस्थित केली.
दुपारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाचे कौतुक करीत इंदापूर तालुक्यासाठी आणलेला निधी हा शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचे जाहीर करीत इंदापूर तालुक्याच्या आमदाराला नाव न घेता पोस्टमनची उपमा दिली.
तर, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे मंजूर करण्यासाठी मी सक्षम असून, आता आणलेला निधी म्हणजे ‘ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार असल्याचे सुतोवाच केले. तसेच, तालुक्याच्या विकासकामांसाठी आपण खंबीर असल्याचे सांगत विरोधकांनी स्वतःचे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावे, असा टोला हर्षवर्धन पाटील यांना लगावला.
एकंदरीत संपूर्ण रविवार हा इंदापूरकरांसाठी राजकीय रंगपंचमीचा ठरला.