
शिर्सुफळ परिसरामध्ये विजेचा लपंडाव
शिर्सुफळ, ता : २९ : महावितरणतर्फे सुमारे दोन महिन्यांपासून सिंगल फेज आणि थ्री फेजची दिवस-रात्र अनियमित भारनियमनाला सुरू आहे. त्यामुळे शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, पारवडी, सिध्देश्वर निंबोडी, जैनकवाडी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी तसेच जिरायत भागातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या अनियमितपणाचा फटका चारा पिके, फुलशेतीला बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत
भारनियमनाबाबत अद्याप कोणतेच वेळापत्रक जाहीर केले नाही. गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपासून कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हापासून सुटका व्हावी, यासाठी ग्रामस्थ घरीच विश्रांतीसाठी थांबत आहेत. वीज नसल्याने पंखे फिरत नसल्याने उकाड्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी आठ तासातील खुपच कमी वेळ वीज पुरवठा होत आहे. विजेअभावी पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने पाणीसाठा उपलब्ध असून देखील पिके जुळून जात आहेत.
पाण्याअभावी फुलशेती सुकली
शिरसाईचे आवर्तन सुटल्याने पाणीसाठा समाधानकारक उपलब्ध आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहे. त्याचबरोबर सध्या यात्रा उत्सव आणि लग्नसराई सुरू आहे. यामुळे गुलछडी, झेंडू, अष्टर आदी फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असतो. मात्र, भारनियमनामुळे वेळच्यावेळी पाणी न मिळाल्याने फुलशेती सुकून जात आहे. तसेच चारा पिके आणि आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सायंकाळी वीज अभावी हेतोखोळंबा
शिर्सुफळ परिसरात मागील दोन महिन्यांपासून वीज चालू राहण्याच्या वेळेपेक्षा वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा सकाळी आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हमखास वीज पुरवठा खंडित केला जातो. यावेळी शेतकऱ्यांना मशिनद्वारे गाईच्या धारा काढणे, चारा मशिनच्या साह्याने कुटी करणे, जनावरांसह आपले पाणी भरून ठेवणे. तसेच महिलांना दळण दळण्यासह स्वयंपाकासाठी सांयकाळची वेळी अत्यंत गरज असते. मात्र यावेळी हमखास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
कुरकुंभ येथून येणाऱ्या विद्युत वाहिनीला झटका बसत असल्यामुळे खांबावरती असणारे चिनी मातीचे पिन इन्सुलेटर यांची विद्युत क्षमता कमी होते. त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे. या विद्युत वाहिनीचे अंतर जास्त असल्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ जात आहे.
- दिग्विजय ठोंबरे, ग्रामीण सहायक अभियंता, बारामती.
03623