
निमगाव केतकी येथील तिघांवर रेशनच्या अपहारप्रकरणी गुन्हा
इंदापूर, ता. ३ : शासकीय रेशनच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील तीन जणांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अतुल सोमनाथ होनराव, औदुंबर सोमनाथ होनराव आणि वत्सला भानुदास शिंदे (तिघेही रा. निमगाव केतकी), अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत इंदापूर तहसीलचे मंडल अधिकारी शहाजी ज्ञानदेव राखुंडे (रा. लोणी देवकर, ता. इंदापूर) यांनी १ मे रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार ,या एकूण प्रकरणामागे एक वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे. ११ एप्रिल २०२२ रोजी रेशन दुकानातील जवळपास ७० हजार रुपये किमतीचे ३ हजार ४८७ किलो धान्य अवैधरीत्या वाहतूक करणारा पिकअप (क्र. एमएच ४२ एम ७०३३) इंदापूर पोलिसांनी पकडला होता. सदरचे धान्य वत्सला भानुदास शिंदे यांच्या रेशन दुकानाला जोडलेल्या मयत रुक्मिणी होनराव यांच्या दुकानातील असल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले होते. परिणामी सर्व धान्य होनराव यांच्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सील केले होते. या संदर्भात इंदापूर तालुक्याचे तत्कालीन पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल २०२२ रोजी मयूर अशोक चिखले, अतुल सोमनाथ होनराव आणि वत्सला भानुदास शिंदे यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सील केलेल्या या धान्याला अन्य रेशन दुकानांमध्ये वर्ग करण्यासाठी तब्बल एका वर्षानंतर (२६ एप्रिल २०२३) रोजी मुहूर्त लागला होता. मात्र, फिर्यादी सदर ठिकाणी गेले असता संबंधित खोल्यांचे सील तोडल्याचे दिसून आले. तपासणीअंती संबंधित खोल्यांमधील गहू, तांदूळ आणि साखर, असे एकूण ४९ हजार ७०० रुपये किमतीचे धान्य कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून जीवनावश्यक धान्य साठ्याचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल केला.