
कुरिअर व्यावसायिकास दीड लाखांचा गंडा
इंदापूर, ता.१४ : अमेझॉनची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून इंदापूरमध्ये एका कुरिअर व्यावसायिकाची तब्बल १ लाख ६२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत महेश ब्रम्हदेव निंबाळकर (रा. खडकपूरा, इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नम्रता बन्सल आणि विनायक चट्टे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सल आणि चट्टे या दोघांनी २० मार्च ते १५ एप्रिल दरम्यान वेळोवेळी कॉल करून अमेझॉनची एजन्सी तुम्हाला मिळणार असल्याचे सांगितले व फिर्यादी यांचे कडून ५ हजार २०० रुपये रजिस्ट्रेशन फीसह १ लाख ५६ हजार ९९२ रु. आयसीआसीआय बँकेत अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. या नावे असलेल्या खात्यावर डिपॉझिट करण्यास सांगितले. ही सर्व रक्कम फिर्यादी यांनी नेट बँकिंग आणि एनइएफटीद्वारे आरोपींना वेगवेगळ्या तारखेस पाठवली. रक्कम आणि कागदपत्रे दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला २६ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान ऑनलाइन ट्रेनिंग देणार असल्याचे सांगितले होते. मात्र या दरम्यान फिर्यादी यांना आरोपींचा कोणताही कॉल अथवा ई-मेल न आल्याने, तसेच त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यावरून तक्रार देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन तांबे करीत आहेत.