
पालखी काळात सर्व सोयी सुविधा पुरवा ः नावडकर
इंदापूर, ता. १९ ः पालखी काळात वैष्णव भक्तांना सोयी सुविधेबाबत कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सणसर, बेलवाडी, लासुर्णे, अंथुर्णे, शेळगाव फाटा, गोतोंडी, निमगाव केतकी, गोखळीचा ओढा, तरंगवाडी, इंदापूर, विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा आणि सराटी येथील मुक्कामाच्या तळांची तसेच विसाव्याच्या परिसराची पाहणी नावडकर व इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केली.
यावेळी बोलताना नावडकर म्हणाले, ‘‘संबंधित अधिकारी वर्गाने पालखी सोहळ्यात येणाऱ्या लाखो वैष्णवभक्तांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यासह संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी इंदापूर तालुक्यात सर्व व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध कराव्यात. तसेच कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.
इंदापूरला यंदाचा मुक्काम औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा इंदापूर शहरातील मुक्काम हा यंदाच्या वर्षी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) प्रांगणात होणार असल्याचे विश्वस्त मंडळांनी त्यांच्या पालखी वेळापत्रकामध्येच नमूद केले आहे. त्यामुळे यंदा परंपरेप्रमाणे होणारा शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे होणार मुक्काम प्रथमच आयटीआयच्या प्रांगणात होणार आहे.
तालुक्यातील पालखीचे वेळापत्रक
बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यात पालखी १९ जूनला प्रवेश करून सणसर मुक्कामी, मंगळवार २० जूनला अंथुर्णे, बुधवार २१ जूनला निमगाव केतकी, गुरुवार, २२ जूनला इंदापूर शहर व शुक्रवार, २३ जूनला सराटी या गावात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.