इंदापूर बसस्थानकातील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इंदापूर बसस्थानकातील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इंदापूर, ता. २० ः इंदापूर शहराच्या बसस्थानकाला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले असताना याची जाणीव करून देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न करता उडवा उडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे इंदापूरमध्ये राज्य परिवहन विभागाला सोयी सुविधांबाबत खबरदारी घेणार आहे की नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इंदापूर बसस्थानक प्रवेशद्वारावर पडलेले खड्डे, सर्वत्र होत असलेल्या अवैद्य पार्किंग, परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि नियोजनाचा अभाव यामुळे बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. याकडे शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये आणल्याच्या घोषणा करणाऱ्या मंत्री राहिलेल्या आजी-माजी आमदार यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. राज्य परिवहन विभागाच्या स्थानिक प्रशासनाचे सदर प्रश्नाकडे लक्ष वेधले असता ठेकेदार, नगरपालिका पोलिस प्रशासन, यांच्याकडे जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, या सर्वांचा समन्वय साधण्याची जबाबदारी ही राज्य परिवहन विभागाची असल्याने प्रवाशांना सेवा सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. किमान आतातरी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

उघड्या चेंबरमध्ये झाडाची फांदी..
बस स्थानकाच्या दुरवस्थेबाबत दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच उघड्या असलेल्या चेंबरभोवती दगड लावून मध्ये तुटलेल्या झाडाची फांदी ठेवत अपघात रोखण्यासाठी मलमपट्टी केली असल्याचे दिसत आहे. तर इमारतीवर वाढलेली मोठी झाडे तशीच असून पिण्याच्या पाण्याच्या जवळील अस्वच्छता कायम आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.


इंदापूर बस स्थानकातील दुरवस्थेबाबत आगार प्रमुख यांना योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात येतील.
-रमाकांत गायकवाड, पुणे विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com