
कमी दराने मका खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा
इंदापूर, ता.२३ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत किमती पेक्षा कमी दराने मका खरेदी करणाऱ्या व्यापारी व आडत दुकानदार यांचे विरुद्ध कारवाई करावी. अन्यथा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा रघुनाथ दादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने बाजार समितीचे सचिव वैभव जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर व उपबाजार निमगाव केतकी, भिगवण, वालचंदनगर या ठिकाणी देखील मका किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. याबाबत शासन कायदा पाळणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होवू नये, यासाठी निवेदन देण्यात येत आहे. या निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना अध्यक्ष ॲड. पांडुरंग रायते, पुणे जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष गुलाब फलफले, इंदापूर तालुका उपाध्यक्ष तुकाराम निंबाळकर यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या मशिनद्वारे एकाच मक्याच्या आद्रतेची तपासणी केली. यामध्ये मशिनच्या आकडेवारीत तफावत आढळून आली. यामुळे तिच्या गुणवत्तेवर व हाताळणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वैभव जोशी म्हणाले, मशिन्समधील वेगवेगळी येणारी टक्केवारी लक्षात घेत या पुढील काळात योग्य ती काळजी घेऊ तसेच किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने जिथे खरेदी झाली असेल तिथे संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातील.