
ऊसतोड मजुरांच्या मुलांनी नृत्यातून मांडली व्यथा
सोमेश्वरनगर, ता. ९ : ''दूर दूर उभी आहे आता माझी शाळा, मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा'' या गाण्यावर तब्बल सहा महिने शाळेपासून दुरावलेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांनी बहारदार नृत्य सादर करून आपली व्यथा मांडली. यावेळी नृत्यप्रसंगात झळा अंगावर घेत ऊस तोडणारी, धुणी धुणारी मुले पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांचा ''सांस्कृतिक महोत्सव'' पार पडला. महोत्सवामधील ''दूर दूर..'' गाण्याने सगळेच हेलावले. मात्र त्यानंतर ''दिल है छोटासा... छोटीशी आशा'' या गाण्याने पुन्हा सुखद किनार मिळाली. ''सोमेश्वर''च्या वतीने मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ''कोपीवरची शाळा'' हा राज्यातील पहिला प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २०० मुलांनी विविध कलाविष्कार सादर केले.
पाचट तुडविणारी आणि ऊस तोडणारी मुले व्यासपीठावर नृत्य आणि गाण्यांची धमाल करत होती आणि त्यांचे सुमारे एक हजार मजूर पालक कलेचे कौतुक करत होते. या महोत्सवाचे तसेच चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सोमेश्वरचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, सराफ संघटनेचे नेते किरण आळंदीकर, संचालक प्रवीण कांबळे, सचिव कालिदास निकम, मुख्याध्यापक संदीप जगताप, गीतांजली बालगुडे उपस्थित होते.
अश्विनी लोखंडे, ज्ञानेश्वर पवार, संतोष होनमाने, शरद ननवरे, संभाजी खोमणे, आरती गवळी, रोहित नगरे, शुभम गावडे यांनी संयोजन केले. प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. माणिक पवार यांनी सूत्रसंचालन तर नौशाद बागवान यांनी आभार मानले.
शिवरायांवरील वक्तृत्वाने उपस्थित भारावले
कार्तिक लोखंडे याच्या ''जय जय कारा'', पूजा जेधे हिच्या ''उगवली शुक्राची चांदणी'', सृष्टी शिरसाटचे ''सैंया सुपस्टार'' या गाण्यांवरील नृत्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ''रब ने बना दी जोडी आन आमी सहा महिने ऊस तोडी'' आणि ''नाद एकच बैलगाडा'' या गाण्यांनीही धमाल आणली. उखाणे, इंग्रजी व मराठी वाचन तसेच अर्चना सूळचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तृत्वामुळे उपस्थित भारावले. समारोपाला झिंगाट गाण्यावर चक्क काही पालकही थिरकले.
01736
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01121 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..