जळीत उसाची कपात परत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीत उसाची कपात परत करा
जळीत उसाची कपात परत करा

जळीत उसाची कपात परत करा

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १३ : सोमेश्वर साखर कारखान्याने उसाच्या गाळपाचे योग्य नियोजन करून विस्तारवाढ वेळेत केली असती व अन्य कारखान्यांशी वेळेत करार केले असते; तर सभासदांचे ऊस वेळेत गाळप झाले असते. सभासदांना फड पेटवून द्यावे लागले नसते व तोडणी कामगारांना पैसे द्यावे लागले नसते. त्यामुळे कारखान्याने जळीत उसापोटी प्रतिटन आठशे रुपयांप्रमाणे कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली.
कारखान्यात बरेचसे संचालक नवीन आहेत, पण जादा उसाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची होती. पंधरा जानेवारीस विस्तारवाढ सुरू होईल, असे सांगितले होते, परंतु नियोजनशून्य कारभारामुळे विस्तारवाढ लांबली. परिणामी सभासदांची ऊसतोड लांबली आणि त्यामुळे एकरी पंधरा टनांचा फटका बसला. ऊसतोड मजुरांनी एकरी पाच ते पंचवीस हजार रुपये घेतले. याची जबाबदारी अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी स्वीकारून सभासदांची माफी मागावी. तसेच, अनेकांना आपला ऊस पेटवून द्यावा लागला आहे. अशा जळीत उसाच्या बिलातून प्रतिटन आठशे रुपये कपात केली, ती कपातही पुन्हा सभासदांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अशी मागणी काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तुमचे अपयश नाही का?
ऊस जास्त आहे, त्यामुळे सभासदांनी उसाची विल्हेवाट लावावी, असे अध्यक्ष आधी सांगत होते. आता संपूर्ण उसाचे गाळप करणार, असे सांगत आहेत. वास्तविक सर्व गाळपाची जबाबादारी त्यांनी स्वीकारायला हवी. यासाठी अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी बाहेरील कारखान्यांशी योग्य पद्धतीने करार करणे आवश्यक होते. त्यामुळे सभासदांना आर्थिक भुर्दंड बसला, हे तुमचे अपयश नाही का? जादा उसाबाबत सभासदांच्या बैठका घेऊन उपाययोजना का केल्या नाहीत? सभासदांना वेळ न देता ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालून दुफळी केली का? असा सवाल काकडे यांनी केला आहे.

सन २०१७-१८ च्या हंगामात सभासदांनी ऊस दरासाठी वीस कोटींचा चढ उतारनिधी उभारला होता. परंतु, अध्यक्षांनी कोरोनाचे निर्बंध शिथिल झालेले असतानाही ऑनलाइन वार्षिक सभा घेऊन ते वीस कोटी रुपये विस्तारवाढीसाठी वर्ग केले. विस्तारवाढीसाठी मागील चार वर्ष तरतुदी करणे आवश्यक होते. पण, अनावश्यक कामे काढून शिल्लक निधी संपविला आणि परिणामी ही नामुष्की आली.
- सतीश काकडे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01130 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top