
ब्राझीलचे धोरण भारतीय साखरेच्या पथ्यावर
सोमेश्वरनगर, ता. २४ ः भारतातील विक्रमी साखर उत्पादनामुळे काळजी वाढलेली असताना जागतिक बाजारात मागणी असल्याने काहीसा दिलासा मिळालेला आहे. आता तर ब्राझीलच्या साखरउद्योगाने साखरेऐवजी इथेनॉलवर भर दिल्याने साखरेचा जागतिक बाजार पुन्हा वधारू लागला आहे. यामुळे ७५ लाख टन साखरेची निर्यात वेगाने पूर्ण झाली असून आणखी निर्यातीची संधी कारखान्यांना खुणावत आहे.
चालू हंगामात आतापर्यंत ३४८ लाख टन साखरनिर्मिती झाली असून अजूनही ११६ कारखान्यांची धुराडी सुरू आहेत. इतक्या प्रचंड साखरेमुळे कारखानदारीसमोर मोठे संकट उभे राहिले असते, परंतु ब्राझीलचे बदलते धोरण भारताच्या पथ्यावर पडले आहे. केंद्राने साखरनिर्यातीस मागील पाच वर्षांत चौदा हजार कोटी अनुदान दिले होते. पण चालू हंगामात एकही रूपया न घेता साखर कारखान्यांनी तब्बल ७५ लाख टन साखर निर्यात केली आहे. अजूनही दहा लाख टनांचे करार झाले आहेत.
फेब्रुवारीपर्यंत जागतिक बाजारात ४७० ते ४९० डॉलर प्रतिटन असे दर असल्याने निर्यातीस ब्रेक बसला होता. मार्चमध्ये काहीशी दरवाढ होऊ लागली. १ ते २० एप्रिल कालावधीत ५३० ते ५५० डॉलर प्रतिटनावर दर गेल्याने निर्यात कमालीची वाढली. मात्र त्यानंतर पुन्हा जागतिक दर ५१० डॉलर प्रतिटनापर्यंत आले होते. मात्र ब्राझीलच्या निर्णयाने दर २० मे रोजी ५५० डॉलर प्रतिटन (२४ सेंट प्रति पौंड) पर्यंत गेले आहेत. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कच्च्या साखरेचे दरही १८.९८ हून २०.१० सेंट प्रतिपौंडवर गेले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने ब्राझीलच्या बहुतांश कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलवर भर देण्याचे ठरविले आहे. ब्राझील ऐन हंगामात तब्बल २२ लाख टन प्रतिमहा साखरनिर्यात करण्याची क्षमता ठेवतो. परंतु चालू हंगाम लांबत आहेच, शिवाय काही कारखान्यांनी साखरनिर्यातीचे करारही रद्द केला आहे. त्यामुळे जागतिक साखरटंचाई भरून काढण्याची नामी संधी भारतीय साखरेस पुन्हा मिळणार आहे. सध्या बांगलादेश, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया देशांमध्ये निर्यात सुरू आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य (७७.५७ रू.) घसरल्याने देशाची पत घसरली तरी साखरनिर्यातीस मात्र फायदा होत आहे.
देशांतर्गत किमती स्थिर असल्याने या हंगामात साखरनिर्यातीनेच तारले आहे. देशांतर्गत दर ३१०० असताना आम्हाला ३२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर निर्यातीस मिळाले. - बाळासाहेब कदम, वित्त व्यवस्थापक , दौलत शुगर
साखरनिर्यात (लाख टनात)
२०१७-१८ - ६.२
२०१८-१९ - ३८
२०१९-२० - ५९.६०
२०२०-२१ - ७१
२०२१-२२ - ७५ (आतापर्यंत)
जागतिक बाजारात साखरेचे दर (डॉलर प्रतिटन)
२० मे ५४९.८५
१६ मे ५४२
१० मे ५१३.१५
५ मे ५१७.७५
२६ एप्रिल ५१६.९०
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01139 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..