
साखर उताऱ्यात ''सहकार''च ठरला सरस
सोमेश्वरनगर, ता. २६ ः पुणे जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांची धुराडी बंद झाली असून उरलेल्या ‘राजगड’चा हंगामही उरकत आला आहे. जिल्ह्याने गाळप आणि साखरनिर्मितीचा विक्रम रचला आहे. १५४ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप करत १६४ लाख ७६ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखर उताऱ्याबाबत ''खासगी''पेक्षा ''सहकार''च सरस ठरला आहे. दरम्यान, उताऱ्यात व्यंकटेश कृपा, सोमेश्वर, पराग यांनी तर गाळपात बारामती अॅग्रो, माळेगाव व सोमेश्वर यांची कामगिरी दमदार ठरली आहे.
जिल्ह्याचा गाळप हंगाम दोनशे दिवसांपेक्षा अधिक काळ चालला. सोमेश्वर, विघ्नहर, भीमाशंकर यांनी अतिरिक्त उसाचे आव्हान पेलले. दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांनीही ऊस संपविण्यास हातभार लावला. जिल्ह्यातील दहा सहकारी कारखान्यांनी ९६ लाख ४२ हजार टन उसाचे गाळप करताना १०.८५ टक्के उतारा मिळवत शेतकऱ्यांसाठी अधिकच्या एफआरपीची वाट तयार केली. सहा खासगी कारखान्यांनीही गाळप उच्चांकी करताना ५८ लाख १८ हजार टनाचा आकडा गाठला. त्यांना साखर उतारा १०.३६ टक्केच राहिला. जिल्ह्याचा सरासरी उताराही १०.६७ टक्के इतका मिळाला. साडेअकरा टक्क्यांच्यावर उतारा मिळविण्याची कामगिरी व्यंकटेश, सोमेश्वर व परागने केली. सलग सहा वर्षांनी सोमेश्वरचे पहिले स्थान व्यंकटेशने पटकावले आहे. नीरा भीमा, कर्मयोगी, राजगड हे सहकारी तर नाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो हे खासगी उताऱ्यात खूपच पिछाडीवर राहिले.
दरम्यान, दहा सहकारींची दैनंदिन क्षमता ५२ हजार टन असताना ९६ लाख टनांचे गाळप केले तर सहा खासगीची दैनंदिन क्षमता ३३ हजार टनांची असताना ५८ लाख टनांचे गाळप केले. बारामती अॅग्रोने १७ लाख टनांपेक्षा अधिक ऊसगाळप केले. तर सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती या तीन शेजारी कारखान्यांनी तब्बल चाळीस लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करून आणि दौंड शुगर, भीमाशंकर, कर्मयोगी या प्रत्येकाने दहा लाखांचा टप्पा ओलांडून ऊस संपविण्यास मोलाचा हातभार लावला.
कारखाने गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विं.) साखर उतारा (%)
१० सहकारी ९६, ४२, २०२ १०,४४,५९९५ १०.८५
६ खासगी ५८, १८,९४७ ६०, ३०, ५९० १०.३६
एकूण १५४,६१,१४९ १६४, ७६, ५८५ १०.६७
जिल्ह्यातील कारखान्यांची उपलब्ध माहिती
कारखाना गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विं.) साखर उतारा (%)
सोमेश्वर १३, २५, ३९५ १५,५४,६२५ ११.७३
माळेगाव १५,०२,८९० १७,०१,६०० ११.३२
छत्रपती १२,५१,७९५ १३,७१,८०० १०.९६
घोडगंगा ६,३०,९८१ ६,९९००० ११.०८
विघ्नहर ११,४३,२११ १२,२३,८०० १०.७०
कर्मयोगी ११,१२,४९० १०, ६८००० ९.६०
नीरा भीमा ७१,७,६७० ६,४५,१५० ८.९९
भीमाशंकर ११,८६,४२६ १३,५१,२२० ११.३९
संत तुकाराम ५८,८,३६२ ६,७१,६५० ११.४२
राजगड १८,४,५७३ १६,४,५२५ ९.०५ (२५ जून अखेर)
दौंड शुगर १२,३७,४६० १३,७७,४०० ११.१३
व्यंकटेश ७१,२,३५५ ८,३७,०५० ११.७५
अनुराज ५०,४,७९० ५,३०,००० १०.५०
नाथ म्हस्कोबा ८०,६,५०५ ७३,४,५७० ९.११
बारामती अॅग्रो १७,३१,०६० १६,०१,६०० ९.२५
पराग अॅग्रो ८२,६,७७७ ९४,९,९७० ११.५०
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01140 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..