
जिल्ह्यातील बळिराजाचा कांद्यामुळे वांदा जिल्ह्यातील बळिराजाचा कांद्यामुळे वांदा
सोमेश्वरनगर, ता. ३० : पुणे-सातारा जिल्ह्यातील कांद्याचा हंगाम संपला आहे; तरीही कांद्याच्या भावात काहीही वाढ झाली नाही. दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील लोणंद बाजार समितीत कांद्याला अवघा ३०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सलग तीन महिने कांद्याच्या भावात काडीमात्र वाढ झाली नाही. परिणामी कांद्याचा संपूर्ण रब्बी हंगाम अक्षरशः वाया गेला आहे.
परतीचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे निम्मा कांदा गेला. बाजारात सुरवातीला डिसेंबर व जानेवारीत ५०० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सदरचा दर नफा देणारा नसला तरी परवडणारा होता. फेब्रुवारीत काही दिवस ८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा चांगला दर शेतकऱ्यांच्या पदरात पडू लागला. परंतु नाशिक-नगर, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश येथे कांद्याचे भरघोस पीक आल्याने आणि निर्यात पुरेशी होत नसल्याने मार्च उजाडताच कांदा गडगडला ते आजतागायत सावरला नाही.
कमी दरामुळे भांडवल देखील निघाले नाही
मार्चअखेरीस ४०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. एप्रिलमध्ये ३०० ते ११०० रुपये दर झाला. सोमवारी लोणंद बाजार समितीत झालेल्या लिलावात उच्च प्रतीचा कांदा ९०० ते १२०० रुपये, मध्यम प्रतीचा कांदा ६०० ते ९०० रुपये तर लहान कांदा ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. पुणे बाजार समितीत ४०० ते १३०० तर लासलगाव बाजार समितीत २०० ते ११५० रुपये दर होते. या दराने शेतकऱ्यांचे भांडवलदेखील निघाले नाही.
भाव वाढीची अपेक्षा फोल
अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. हंगाम संपताना तरी भाव वाढतील अशी त्यांची अपेक्षाही फोल ठरली आहे. साठवणूक केल्याने खरीप कांदा बाजारात येण्याआधी जुलै, ऑगस्ट महिन्यात मिळू शकणारी भाववाढही रोखली जाईल, अशी शक्यता आहे.
कांदा उत्पादक बापू जगताप व लक्ष्मण लकडे म्हणाले, चालू कांदा हंगाम पूर्णपणे वाया गेला. मशागत, औषधे, रोपे असा सगळाच खर्च वाढल्याने एकरी भांडवल सत्तर-ऐंशी हजारांहून लाखावर गेले आहे. तेवढीही रक्कम निघू शकली नाही.
रब्बी हंगाम संपला तरी नाशिक व नगर भागातील उन्हाळी कांदा अजूनही बाजारात येत आहे. निर्यातीत अन्य देशांनी बाजारपेठा बळकावल्या आहेत. केंद्रसरकारचे आयात-निर्यात धोरण काळजीपूर्वक आखले जात नाही. यामुळे अद्यापही भाव नीचांकी पातळीवरच आहेत.
- राजेंद्र तांबे, सभापती, लोणंद बाजार समिती
लोणंद बाजार समितीतील प्रतवारीनुसारचा दर
दिनांक दर प्रतिक्विंटल रू.
३० मे ३०० ते १२००
१६ मे ३०० ते १०००
१८ एप्रिल ३०० ते ११५१
३१ मार्च ४०० ते १३००
२ मार्च ५०० ते २०००
१० फेब्रुवारी ८०० ते ३०००
१० जानेवारी ५०० ते २४५०
३० डिसेंबर ५०० ते २५४०
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01146 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..