योजना आली, कोणालाच माहिती नाही झाली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योजना आली, कोणालाच माहिती नाही झाली!
योजना आली, कोणालाच माहिती नाही झाली!

योजना आली, कोणालाच माहिती नाही झाली!

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १ : शालाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआउट’ ही महत्वाकांक्षी मोहीम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याची तारीख (५ जुलै) तीन दिवसांवर आली आहे. मात्र, ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्यातील अनेकांना अद्याप त्याची कल्पनाच नाही. याशिवाय शिक्षक प्रशिक्षण, व्यापक जनप्रबोधन, याचाही अद्याप अभाव आहे. त्यामुळे सदर मोहीम नेहमीप्रमाणे सोपस्कर पार पाडण्यापुरती राहील, अशी चिन्हे आहेत.
कोरोनाकाळ व स्थलांतर व अन्य कारणांनी वंचित व दुर्बल घटकांतील काही लाख मुले शाळेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण हक्क कायद्यास अनुसरून शंभर टक्के मुले शोधून दाखल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ५ ते २० जुलै या पंधरा दिवसांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ ही मोहीम राबविली आहे. मार्च २०२१ मध्ये राबविलेल्या शालाबाह्य मूल शोध मोहिमेचा फज्जा उडाला. त्यानंतर शासनाने आता ‘आदर्श’ परिपत्रक जारी केले होते. त्याअंतर्गत ३ ते १८ वयोगटातील शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत वाजतगाजत दाखल करण्याचे आदेश दिले होते.
शिक्षण विभागासोबत महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक, सार्वजनिक आरोग्य, गृह अशा अन्य दहा विभागांवरही या मोहिमेची जबाबदारी टाकली होती. एकही मूल वंचित राहू नये, यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र व गाव अशा पाच स्तरावर समित्या स्थापन करण्याचे नियोजन दिले होते. राज्यस्तरावर प्रधान सचिव, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर तहसीलदार, केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख, तर गावस्तरावर सरपंचांना समितीचे अध्यक्ष केले होते. शिक्षण सहसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक हे अनुक्रमे सचिव होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांनाही जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, याप्रमाणे नियोजन न झालेले दिसत नाही.
शिक्षकांच्या बदल्यांसह अनेक माहित्यांच्या जंजाळात अडकलेला शिक्षण विभागही एकटा या योजनेस न्याय देईल, अशी शक्यता नाही. योजनेला चळवळीचे स्वरूप न दिल्यास मुले शाळेबाहेर ढकलले जाण्याची परंपरा टिकून राहण्याची दाट शक्यता आहे.

सर्वांचेच हात वर
याबाबत पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी, ‘आजारी असल्याने मी माहिती घेऊन सांगतो,’ असे सांगितले. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी, ‘याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारावे लागेल,’ असे सांगत कल्पना नसल्याचे अप्रत्यक्ष नमूद केले. वाघळवाडी (ता. बारामती) सरपंच नंदा सकुंडे यांनी, ‘याबाबत पत्रव्यवहार झाल्याचे माहितीत नाही,’ असे सांगितले. पुरंदरमधील एका शिक्षकाने, ‘याबाबत अद्याप कुठलेही प्रशिक्षण अथवा आदेश नाही,’ असे सांगितले. तर, बारामतीतील शिक्षकाने, ‘याबाबत सर्वेक्षण करण्याचे मेसेज आले आहेत,’ अशी माहिती दिली. पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे यांनी, ‘सोमवारपासून चोख नियोजन करणार आहे,’ अशी माहिती दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01175 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top