आरक्षणाच्या घोळामुळे इच्छुक पुन्हा गॅसवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणाच्या घोळामुळे इच्छुक पुन्हा गॅसवर
आरक्षणाच्या घोळामुळे इच्छुक पुन्हा गॅसवर

आरक्षणाच्या घोळामुळे इच्छुक पुन्हा गॅसवर

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ३० ः पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची गुरुवारी झालेली सोडत रद्द करून नव्याने सोडत काढावी लागणार आहे. आरक्षण सोडतीतील चूक पुढे आल्याने हिरमोड झालेल्यांच्या आशेला नवी पालवी फुटली आहे. तर अनुकूल आरक्षण पडल्याने खुशीत गेलेले पुन्हा गॅसवर गेले आहेत. विशेष करून बारामती तालुक्यात जास्त फेरबदल होण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्यात एकही सर्वसाधारण जागा उपलब्ध न झाल्याने अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला होता अशात ''अनुसूचित जात'' आरक्षण तीन ठिकाणी पडले होते. हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढणे अपेक्षित असते. २००२, २००७, २०१२, २०१७ या मागील चार निवडणुकांमध्ये जर अनुसूचित जात आरक्षण असेल तर ते पुन्हा त्या ठिकाणी पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. मात्र, वडगाव निंबाळकर-सांगवी व नीरा वागज-डोर्लेवाडी या मतदारसंघात अनुक्रमे २०१२ व २००७ मध्ये अनुसूचित जात आरक्षण पडलेले असताना पुन्हा टाकण्यात आले होते. सदर बाब सर्वप्रथम दैनिक ''सकाळ''ने शुक्रवारी (ता. २९) ''बारामतीतील गटांच्या आरक्षणाबाबत आक्षेप'' असे वृत्त प्रसिद्ध करून निदर्शनास आणून दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फेरसोडतीस परवानगी मागितली आहे.
सदर दोन मतदारसंघातील अनुसूचित जात हे आरक्षण रद्द होऊन ते जिल्ह्यात अनुसूचित जात प्रवर्गातील लोकसंख्या जिथे जास्त असेल आणि चार निवडणुकांत ते आरक्षण पडले नसेल अशा मतदारसंघात जाणार आहे. ज्या मतदारसंघाकडे हे आरक्षण जाईल तिथे गुरुवारी पडलेले आरक्षण अन्यत्र जाईल. अशा बदलांमुळे जिल्ह्यातील ८२ पैकी साधारणतः पाच ते दहा मतदारसंघावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. ते मतदारसंघ नेमके कोणते हे सांगणेही कठीण असल्याने संपूर्ण जिल्ह्यात अनुकूल आरक्षण पडल्याने जे मोहरून गेले होते त्यांचे पुन्हा फेरसोडतीकडे लक्ष लागले आहे. ५ ऑगस्टला आरक्षण अंतिम होणार आहे. तोपर्यंत ज्यांच्यासाठी प्रतिकूल आरक्षण होते त्यांच्या आशा मात्र वाढल्या आहेत.

बारामतीवर सर्वाधिक परिणाम
वडगाव निंबाळकर-सांगवी व नीरा वागज-डोर्लेवाडी यांचे आरक्षण बदलल्यास ते इतर मागास प्रवर्ग किंवा सर्वसाधारणमध्ये परावर्तित होऊ शकतात. यामुळे या दोन मतदारसंघ हॉट सीट बनले आहेतच. शिवाय तालुक्यातीलच सुपे-काऱ्हाटी आणि निंबूत-वाघळवाडी या दोन मतदारसंघात अनुसूचित जात प्रवर्गाची लोकसंख्या अधिकची आहे. त्यामुळे तेथील सध्याच्या आरक्षणाने सुखावलेले इच्छुकही टेन्शनमध्ये गेले आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01214 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top