
शिक्षकांचे समायोजन करणार कोठे?
सोमेश्वरनगर, ता. ४ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरी हद्दीत वर्ग झालेल्या ३८ शाळांच्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केले आहे. सदर बदलीपात्र शिक्षक व मुख्याध्यापकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात केवळ १४४ जागा रिक्त असताना साडेपाचशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन कोठे करणार? असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाने करत बदलीप्रक्रियेस विरोध केला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३८ गावे पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये व बारामती नगरपालिकेत समाविष्ट झाली. या गावांतील ६६ शाळा शहरी हद्दीत वर्ग करण्यात आल्या, मात्र त्या शाळांवरील शिक्षक, मुख्याध्यापक मात्र जिल्हा परिषदेकडेच कर्मचारी म्हणून राहिले आहेत. पुणे महापालिकेत गेलेल्या शाळांचे ४१३, पिंपरी चिंचवड महापालिकेत गेललेल्या शाळांचे ९६, उर्दू शाळांचे ५; तर बारामती नगरपालिकेत गेलेल्या शाळांचे ५७ शिक्षक आहेत. यातील बहुतेकांची शहरांत वर्ग करण्याची मागणी आहे. शिवाय महापालिकेकडे सदर मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकही नाहीत. आजही हे शिक्षक त्याच शाळांवरील मुलांना शिकवत आहेत.
या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांवरील रिक्त जागांवर समायोजन करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य सरकारला मार्गदर्शन मागविले होते. जिल्हास्तरावर सदर शिक्षक अतिरिक्त ठरत नाहीत. त्यामुळे त्यांचे महानगरपालिकेकडे हस्तांतर करता येणार नाही, असे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यानुसार प्रसाद यांनी, संबंधित शिक्षकांना ऑनलाइन समायोजन बदलीसाठी अर्ज भरण्यास कळवा, असे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सीईओ यांच्याच पत्रानुसार जिल्ह्यात उपशिक्षकांची मंजूर पदे ११ हजार २७५ आहेत, तर कार्यरत पदे ११ हजार १३१ आहेत. म्हणजेच रिक्त जागा १४४ आहेत. मग ५७१ शिक्षकांचे समायोजन कसे करणार? सीईओ म्हणतात, ‘कार्यरत शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदोन्नती केल्यास शिक्षकांच्या आणखी दोनशे जागा रिक्त होतील.’ परंतु, ५७१ मध्ये जे मुख्याध्यापक आहेत, त्यांना कुठे समायोजित करणार? सध्या ५७१ शिक्षक शहराकडे वर्ग झालेल्या शाळांवर शिकवत आहेत, त्यांना शिकवूद्या. हटवादी बदल्या थांबवा.
- केशव जाधव, सरचिटणीस, शिवाजीराव पाटीलप्रणित प्राथमिक शिक्षक संघ
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01219 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..