शेतकरी-अधिकारी मांडणार आपापली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी-अधिकारी मांडणार आपापली भूमिका
शेतकरी-अधिकारी मांडणार आपापली भूमिका

शेतकरी-अधिकारी मांडणार आपापली भूमिका

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १४ : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या विषयावरून अनेक शेतकरी अस्तरीकरणाचे तोटे; तर जलसंपदाचे अधिकारी गरज माध्यमांद्वारेच मांडत आहेत. मात्र, पहिल्यांदाच आंदोलक व जबाबदार अधिकारी यांच्यात शुक्रवारी (ता. १६) जलसंपदाच्या बारामती येथील विश्रामगृहावर दुपारी बारा वाजता बैठक व चर्चा होणार आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे आणि कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी यास दुजोरा दिला आहे.
नीरा डाव्या कालव्याचे १५२ किलोमीटरपैकी वेगवेगळ्या २९ ठिकाणी सुमारे ३५ किलोमीटर अस्तरीकरण होणार आहे. त्यानुसार टेंडर निघून कामांचीही तयारी सुरू केली होती. परंतु, बारामती तालुक्यातील विरोधाची पहिली ठिणगी पडली. हळूहळू शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीच्या माध्यमातून इंदापूर, बारामती, पुरंदरमधील शेतकरी एकवटले. परिणामी जलसंपदास काम थांबवावे लागले आहे. दरम्यानच्या अलीकडच्या काही दिवसात कालव्याच्या वितरिकेद्वारे दूर अंतरावर पाणी घेणारा शेतकरी मात्र पाठिंबा उघडपणे व्यक्त करू लागला आहे. आता नीरा डावा कालव्याचे पाणी तात्पुरते बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा हालचाल चालू झाल्याची शेतकऱ्यांची अटकळ आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि अधिकारी यांच्यामध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. वास्तविक काम आणताना व सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांसोबत चर्चा होणे अपेक्षित होते. अस्तरीकरण का होणार आहे, किती जाडीचे होणार, कोणत्या टप्प्यात होणार, सरसकट होणार का, पाझर थांबल्यावर आजूबाजूच्या विहिरींचे काय होणर, उचलपाण्याची अधिकृत परवानगी देणार का? असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीत आणि संभ्रमाचे आहेत.

विरोधातील मुद्दे मांडणार : सतीश काकडे
‘‘जलसंपदाला पत्रे दिली होती, मात्र त्यांच्याकडून असमाधानकारक माहिती मिळालेली आहे. काम पुन्हा सुरू केले जाणार असल्याची आणि प्लास्टिक कागद टाकून प्लास्टर केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानुषंगाने कार्यकारी अभियंत्यांनी शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीशी बैठक आयोजित केली आहे. अस्तरीकरण न होण्याच्या बाजूचे भक्कम व रास्त मुद्दे मांडण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे,’’ असे आवाहन सतीश काकडे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले गेले पाहिजे. भविष्यातील उपलब्धता आणि नियोजन तसेच जुना झालेला कालवा सुस्थितीत राहावा, पाण्याची उपलब्धता वाढवा यासाठीही चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही, याचीही ग्वाही द्यावी लागणार आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे.
- राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01274 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..