गुळुंचे येथील मतदारांच्या लढ्याला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळुंचे येथील मतदारांच्या लढ्याला यश
गुळुंचे येथील मतदारांच्या लढ्याला यश

गुळुंचे येथील मतदारांच्या लढ्याला यश

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १४ : कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची नावे खोटे पंचनामे करून परस्पर वगळण्याचा प्रताप गुळुंचे (ता. पुरंदर) गावचे तलाठी गणेश महाजन यांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश काढला आहे. तसेच, मतदानाच्या अमूल्य हक्काचा लढाही यशस्वी झाला आहे. कारण, वगळलेल्या मतदारांना पुन्हा समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
गुळुंचे गावच्या ३३ मतदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता मतदारयादीतून वगळले होते, तर वेळेत नावे देऊनही ४७ नवमतदारांची नावे समाविष्ट केली नव्हती. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत यावरून मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘सकाळ’नेही वृत्त प्रसिद्ध करत मतदारांची व्यथा मांडली होती. सरपंच संतोष निगडे यांनी मतदारांच्या वतीने पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यातून नवमतदारांची नावे समाविष्ट केली. मात्र, वगळलेल्या नावांवरून सुनावण्या सुरू होत्या. सुरवातीस तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत तलाठ्यांवरच ठपका ठेवण्यात आला.
मतदारांची नावे वगळताना रीतसर १३ व १४ क्रमांकाच्या नोटीस बजावणे बंधनकारक असते. मात्र, तलाठ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब न करता खोटे पंचनामे केले. हेतुपुरस्सर नावे वगळली, असे तहसीलदारांना आढळले. त्यामुळे त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना दिला होता. तलाठ्यांची बाजू योग्य असल्याचा नितीन निगडे यांचा युक्तिवाद व कोतवाल नारायण भंडलकर यांचा अनुकूल जबाबही तलाठ्यांना वाचवू शकला नाही.
प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही महाजन यांनी, नोटीस बजावण्यास गेलो, पण मतदार गावात नव्हते. गावातील नागरिकांनी पंचनाम्यावर स्वाक्षरी केली नाही, असा लटका युक्तिवाद करत जाहीर माफी मागितली. मात्र, तहसीलदारांचा अहवाल पाहिल्यावर प्रांताधिकाऱ्यांना, बेकायदेशीरपणे नावे वगळून तलाठी हे कार्यालयाचीच दिशाभूल करत आहेत, हे निदर्शनास आले. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्य करत तलाठ्यांवर ठपका ठेवला.

मतदार नोंदणी यंत्रणेस धडा
बेकायदेशीर पद्धतीने मतदारांची नोटीस न देता नावे वगळली म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार तलाठी गणेश महाजन यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच, चौकशी करून मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचाही आदेश केला आहे. या निकालामुळे मतदार नोंदणी करणाऱ्या सरकारी यंत्रणेस हा एक प्रकारे धडा मिळाला आहे, तर मतदारांनाही मतदानाचा मोलाचा हक्क मिळविण्यासाठी लढा दिल्यास यश मिळते हे अधोरेखित झाले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01275 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..