बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर
बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर

बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १६ ः राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता पुणे जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. २९ जानेवारीला बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. यासाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी मतदार यादीत नाव आणण्यापासूनच मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांत राजकीय पक्षांना स्वतःला आजमावता येणार असल्याने निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जानेवारी २०२२ रोजी होणार होत्या. मतदार याद्यादेखील अंतिम करण्यात आल्या होत्या. परंतु कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्याशिवाय या घेऊ नयेत यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आणि निवडणुका रखडल्या. आता राज्यातील ३०५ पैकी तब्बल २८१ बाजार समित्यांची मुदत संपली आहे. नव्या सरकारच्या नियोजनानुसार राज्य प्राधिकरणाने पुन्हा एकदा मुदत संपलेल्या, प्रशासक असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात दहा बाजार समित्या निवडणुकीस पात्र आहेत.
राज्य सरकारने दहा गुंठे क्षेत्र नावावर असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा घाट घातला होता. परंतु, आर्थिकदृष्ट्या बाजार समित्यांचा पाय खोलात जाईल याचा अंदाज आल्याने जुन्याच पद्धतीने निवडणुका होणार आहेत. त्यानुसार सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २ तर हमाल-मापाडी १ असे १८ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा उपनिबंधक, गटविकास अधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत, सोसायटी मतदारसंघासाठी सदस्य सूचीबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

राजकीय आखाडा रंगणार
३१ डिसेंबर २०२२ अखेर ज्यांची मुदत संपणार आहे अशा बाजार समित्या निवडणुकीस पात्र आहेत. पुणे जिल्ह्यातील नीरा, भोर, मावळ, जुन्नर, मंचर, खेड यांची मुदत वर्षापूर्वीच संपलेली आहे. तर नव्याने बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर यांचीही मुदत संपत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी दिली. बाजार समित्यांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व असले तरी आता सत्ताबदलामुळे शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांनाही जोरदार रसद मिळणार असल्याने राजकीय आखाडा रंगणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम
२७ सप्टेंबर २०२२ - सदस्य सूची मागविणे
०३ ते ३१ ऑक्टोबर - प्रारूप मतदार यादी करणे
१४ नोव्हेंबर - प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी
१४ ते २३ नोव्हेंबर - हरकती
२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर - हरकतींवर निर्णय
७ डिसेंबर - अंतिम मतदार यादी

निवडणूक कार्यक्रम -
२३ ते २९ डिसेंबर - नामनिर्देशनपत्र दाखल
३० डिसेंबर - छाननी
२ जानेवारी २०२३ - वैध उमेदवार यादी
२ ते १६ जानेवारी - अर्ज माघार
१७ जानेवारी - चिन्हवाटप
२९ जानेवारी - मतदान
३० जानेवारी - मतमोजणी व निकाल

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01276 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..