भागविकास निधी प्रतिटन ५० रुपये कपात करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भागविकास निधी प्रतिटन 
५० रुपये कपात करणार
भागविकास निधी प्रतिटन ५० रुपये कपात करणार

भागविकास निधी प्रतिटन ५० रुपये कपात करणार

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २९ : सोमेश्वर साखर कारखान्याच्या वार्षिक सभेने ऊसबिलातून प्रतिटन ५० रुपये भागविकास निधी कपात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सभेत कारखान्याची शिक्षण संस्था व अहवालावरून सडेतोड चर्चा झाली.
‘सोमेश्वर’ची सभा पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी, प्रतिटन १०० रुपये भाव वाढवून द्यावा. एफआरपी एकरकमीच द्यावी. अशी मागणी करत त्यासाठी प्रसंगी मिल बंद पाडू असा इशारा दिला. कारखान्यावर आज १४८ कोटीचे कर्ज असून, डिस्टिलरी व कोजनरेशन प्रकल्प उभारल्यावर ते ३०० कोटींच्या पुढे जाईल, अशी भीती व्यक्त केली. शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग व एमबीए कॉलेजचे ‘शरदचंद्र पवार’ असे नामकरण केले आहे. पवार आदरस्थानीच आहेत, पण त्यास संस्थापक कै. मुगुटराव काकडे अथवा सोमेश्वर असे करण्याचा पर्याय आहे, असे सुचविले.
यावर अध्यक्षांनी, शिक्षणसंस्था सामान्य सभासदांसाठी कार्यरत आहे. ऊसबिलातून व पवार कुटुंबाच्या मदतीतून ३९ कोटी उपलब्ध झाले आणि विज्ञान, इंजिनिअरिंग, एमबीए, बीसीए यासाठी भौतिक सुविधा उभ्या राहिल्या. त्यांच्या पगारासारखे खर्च फीमधून भागतात. पुढील विकास साधण्यासाठी व दर्जा, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी कपात करत आहोत. महाविद्यालयास शरद पवार यांचे नाव त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे स्पष्ट केले. कारखान्याने जिल्ह्यात उत्कृष्ट भाव दिला असून, आगामी हंगामातही अतिरिक्त ऊस असून तो संपविण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.
मदन काकडे यांनी, उसाचा भाव ३२७३ रुपये प्रतिटन मिळत असूनही कारखान्याने चुकीच्या पद्धतीने ३०२० दिला आहे, असा आरोप केला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी समाधानकारक खुलासा केला. शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनीही सभासदांच्या विविध प्रश्नांचा खुलासा केला.

सभासदांकडून प्रश्नांकडून सरबत्ती
५ कोटीपेक्षा अधिकच्या रकमा निर्लेखीत केल्याबद्दल संचालक मंडळास शंकर दडस, कांचन निगडे, पी. के. जगताप, बाळासाहेब गायकवाड यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अध्यक्षानी या रकमा सन १९९२ पासून सन २०१५ पर्यंतच्या जुन्या असून, अनेक प्रयत्न करूनही वसूल न होणाऱ्या व संस्था अस्तित्वात नसलेल्या आहेत, असा खुलासा केला.
पी. के. जगताप यांनी मागील ऑनलाइन सभा बेकायदेशीर असल्याची टीका केल्यावर अध्यक्षांनी त्यास विरोध करत तसे सिद्ध करण्याचे आव्हान केले. धैर्यशील काकडे यांनी विस्तारीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, अन्यथा किमती वाढतात, असे मत मांडले. गोरख खोमणे यांनी प्रदूषण कमी करण्याची मागणी केली.