‘सोमेश्‍वर’च्या दहा गावांचा वाद न्यायालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’च्या दहा गावांचा वाद न्यायालयात
‘सोमेश्‍वर’च्या दहा गावांचा वाद न्यायालयात

‘सोमेश्‍वर’च्या दहा गावांचा वाद न्यायालयात

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १ : सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा महसुली गावे माळेगाव कारखान्याकडे समाविष्ट करण्याचा विषय आता सहकार न्यायालयात गेला आहे. भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिलीप खोमणे या जळगाव सुपे गावच्या सभासदामार्फत ही कार्यवाही केली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी घेतलेले ठराव निर्णायक ठरणार की वाया जाणार, हे सहकार न्यायालयाच्या निर्णयानंतरच कळणार आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंजनगाव, जळगाव क. प., जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, काऱ्हाटी, खराडेवाडी ही दहा जिराईत गावे ‘माळेगाव’ने मागीतली होती. ‘सोमेश्वर’च्या २९ सप्टेंबरच्या वार्षिक सभेत सभासदांच्या संमिश्र प्रतिसादानंतर गावे ‘माळेगाव’ला जोडण्याचा ठराव मंजूर केला. तुलनेने ‘माळेगाव’च्या वार्षिक सभेत अधिक घमासान झाले. या विषयावरून सभेत गोंधळ सुरू असतानाच सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर करून घेतला. मात्र, त्याच सभेच्या ठिकाणी प्रतिसभा घेऊन हा विषय नामंजूर केल्याचा आवाजदेखील खूप मोठा होता.
या पार्श्वभूमीवर आता सोमेश्वर कारखान्याचे सभासद व भाजप नेते दिलीप खैरे यांनी यापूर्वीच इशारा दिल्याप्रमाणे सभासद व जळगाव सुपेचे माजी सरपंच दिलीप खोमणे यांच्यामार्फत पुण्याच्या सहकार न्यायालयात या विलीनकरणाविरोधात दावा दाखल केला आहे. आता न्यायालयात कारखान्यांचे ठराव निर्णायक ठरतात की सभासदांची वैयक्तिक इच्छा निर्णायक ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नेत्यांसाठी अट्टहास : दिलीप खैरे
याबाबत दिलीप खैरे म्हणाले, ‘‘संचालक मंडळांनी नेत्यांना खूष करण्यासाठी नेहमीप्रमाणे सभासदांच्या हिताविरोधात रेटून मंजूरी मिळविली आहे. विस्तारीकरणास विलंब झाल्याने प्रचंड आर्थिक बोजा वाढला, सभासदांचे नुकसान झाले यावरही चर्चा झाली नाही. आजूबाजूचे कारखाने नव्याने क्षमता व कार्यक्षेत्र वाढवत आहेत. मोदी सरकारच्या साखर धोरणास अनुसरून ‘सोमेश्वर’नेही व्यवसायिक दृष्टिकोनातून जादा ऊस गाळपासाठी विस्तारवाढ लवकर करणे अपेक्षित होते. पण, याऐवजी दहा गावांचे ‘माळेगाव’ला हस्तांतरण करावे, ही गंभीर बाब आहे. नेतृत्वाची माळेगाव कारखान्याची निवडणूक लढविताना होत असलेली दमछाक व पराभव यातून सुटका करण्यासाठी काही कार्यकर्ते हा अट्टहास करत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या मार्गाने जात आहोत.’’

जिराईत भागातील काही लोकांनी ‘माळेगाव’ला जोडावे, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी ‘माळेगाव’च्या बहुसंख्य सभासदांनी ‘नामंजूर नामंजूर’ अशा किती घोषणा दिल्या, हे पहावे. ते पाहिल्यावर स्वाभीमानी सभासदांना स्वतःहूनच जाणार नाही.
- दिलीप खैरे, भाजप नेते