सभासदच ठरवणार कारखाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदच ठरवणार कारखाना
सभासदच ठरवणार कारखाना

सभासदच ठरवणार कारखाना

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव साखर कारखान्याला जोडण्यासंदर्भात दोन्ही कारखान्यांच्या क्षेत्रात अजूनही वाद-प्रतिवाद सुरूच आहेत. याबाबतचा ठराव कारखान्यांनी घेतला असला, तरी त्या गावातील शेतकऱ्याचे सभासदत्व रद्द करता येणार नाही. उसाचा झोनबंदी कायदा अस्तित्वात नसल्याने कोणत्या कारखान्याकडे जायचे, हा सभासदांचा व्यक्तिगत अधिकार अबाधित राहणार आहे, असे मत साखर उद्योगातील जाणकार व्यक्त करत आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंजनगाव, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, खराडेवाडी, नारोळी, कोळोली, काऱ्हाटी, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी ही गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आला. ‘माळेगाव’च्या अनेक सभासदांनी गावांना स्वीकारण्यास विरोध केला आहे. मात्र, सत्ताधारी मंडळींनी याबाबत गोंधळात ठराव करून घेतला. वाहतुकीस जवळ, दर्जेदार शिक्षणसंकुल आणि चांगला भाव, यासाठी माळेगाव हवा, अशी काहींना इच्छा असू शकते. मात्र, जिराईतदारांना सांभाळून घेणारा हक्काचा सोमेश्वर सोडायचाच नाही, अशा भावनाही काही सभासदांच्या आहेत. ‘माळेगाव’च्या काही निवडक मंडळींकडून आताच कुसळी सभासद, अशी संभावना सुरू झाल्याने अस्वस्थता काहीशी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तीक पातळीवर सभासद ‘सोमेश्वर’ला रहायचे की ‘माळेगाव’ला जायचे, हे स्वतः ठरवू शकतो, हा मधला मतप्रवाह पुढे येत आहे. गावांच्या तोडफोडीत सभासदत्व मात्र कायद्याने रद्द करता येणार नाही.

कारखान्याच्या गावांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सभासदांना म्हणजेच सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आहे. कारखान्यांनी घेतलेले ठराव बरोबर आहेत का, हे तपासून जॉइंट रजिस्टार आदेश देतात. परंतु, सध्या उसाचा झोनबंदी कायदा अस्तित्वात नाही. सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती कारखान्यांमध्ये अनेक सभासद दोन-दोन कारखान्यांना आहेत. एखाद्या गावातील पाचशेपैकी तीनशे इकडे आणि दोनशे तिकडे, असेही आहे. त्यामुळे कारखान्याने ठराव घेतला म्हणून सभासदत्व रद्द होत नाही. इथून पुढे ज्यांना सभासद व्हायचे, ते अन्यत्र होई शकतील. तसा अधिकार त्यांना आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे उसाचा झोनबंदी कायदाच रद्द झाला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्र नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी घेतलेले ठराव बेकायदेशीर आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चार-चार कारखान्यांना शेतकरी सभासद आहेत आणि ऊस घालतात. मात्र, एकाच कारखान्याला सभासद असेल; तर तिथे निवडणुकीचा अधिकार मिळतो. तक्रार झाली तर दुसऱ्या कारखान्याचे सभासदत्व रद्द होऊ शकते. शेतकरी कुठे सभासद व्हायचे आणि कुठे ऊस घालायचा, यासाठी मुक्त आहेत. त्यांना वार्षिक सभा किंवा कारखाने रोखू शकत नाहीत.
- राजू शेट्टी, माजी खासदार