एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभारा
एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभारा

एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभारा

sakal_logo
By

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन; सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गव्हाणपूजन

सोमेश्वरनगर, ता. ९ ः ''सोमेश्वर'' डिस्टिलरीची विस्तारवाढ तीस हजारांहून साठ हजार करायची आहे, त्यासाठी विशेष सभा बोलवा, किमान एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी उभारा, वाटल्यास मी स्वतः सभासदांशी बोलायला येईन,’ असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाण पूजन शुभारंभ तसेच सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन इमारतींचा व कामगार वसाहतींचा उद्घाटन समारंभ पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रेय भरणे होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, नीता फरांदे, सतीश खोमणे, माणिक झेंडे, दत्तात्रेय येळे आदी उपस्थित होते.

नीरा डावा कालवा १३५ वर्षे जुना असल्याने अस्तरीकरण आवश्यक आहे. ते प्लास्टिक कागद न वापरता होईल. सरसकट न करता जिथे वळण, उंच भराव, गळती आहे तिथेच होईल. अर्थात शेतकऱ्यांची संमती असेल तरच, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
--------------
चौकट ः
------------------
अस्तरीकरणप्रकरणी विरोधकांची नौटंकी
काहीजण कालवा अस्तरीकरणाबाबत चुकीचे सांगत आहेत. बारामती, पुरंदरमध्ये सांगायला दुसरे काही नाहीच. फडणवीस सरकारच्या काळात काही शहाण्यांनी बंद पाइपलाइन करणार असे सांगितले, दुसऱ्याने पाणी पळवले. आता जे नौटंकी करतात ना, त्यांनी त्यावेळी ‘ब्र’ काढला नाही आणि आता मात्र दिशाभूल करीत आहेत. आम्ही मजबूत कायदा करून उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यांना समान न्याय दिला. नाहीतर उन्हाळ्यात डाव्या कालव्याला पाणीच मिळाले नसते, असे अजित पवार यांनी सांगितले.
-----------------
खट्टसुद्धा नको!
संचालक मंडळाला दिवाळीत बोलावून घेणार आहे. काही गोष्टी बोलायच्या आहेत. कुणाचे काय चुकते, संचालकांच्या बैठका कशा चालतात हे बघायचे आहे. संचालकांमध्ये कुठंही ‘खट्ट’ आवाज येता कामा नये. कारण संस्था नीट चालली पाहिजे, असे अजित पवार यांनी सूचित केले.
-----------------