‘ह्यो बाबा थांबायचं नावच घेईना...’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ह्यो बाबा थांबायचं नावच घेईना...’
‘ह्यो बाबा थांबायचं नावच घेईना...’

‘ह्यो बाबा थांबायचं नावच घेईना...’

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १८ : ‘इतका कुठं पाऊस आसतो का? ह्यो बाबा थांबायचं नावच घेईना. सोयाबीन, घेवडा, कांदा, बाजरी सगळं पार नासून गेलं. ऊससुद्धा पार गेला. शेती आसून गुरांला चारा नाही. डोंगरावर गुरं सोडावी लागत्यात. ऐन दिवाळीत दिवाळं वाजलं,’ अशा हतबल भावना सुरेश पवार, भगवान पिंगळे, सोमनाथ सुतार, सुरेखा लकडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पुरंदर तालुक्यातील पाटबंधारेच्या पिंपरे बंगल्यावर २४ तासात ६५ मिलीमीटर पाऊस कोसळला. बारामती तालुक्यात सोमेश्वर कारखान्यावर ९९; तर वडगाव बंगल्यावर ५५ मिलमीटर पाऊस नोंदला आणि एकूण १०२६ मिलमीटर पाऊस झाला. पाचशे ते साडेपाचशे सरासरी असलेल्या बारामती, पुरंदरमध्ये दुप्पट पाऊस कोसळला. पुरंदरचा नाझरे व लपतळवाडी तलाव; तर बारामतीतले पुरंदरे, वाकी, सोमेश्वर हे तलाव पूर्ण भरले आहेत. याशिवाय बंधारे, ओढे, नाले, विहीरी तुडुंब झाले. सोरटेवाडीचे (ता. बारामती) सोमनाथ सोरटे यांचे अडीच एकर सोयाबीन काढून शेतात भिजत पडले असून पाऊस वाळवून भरडायला दहा दिवस झाले उसंत देईना. कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील सुरेश पवार, सोमनाथ पवार यांची झिरीपवस्ती येथील सगळी डोंगरपायथ्याची शेतीच्या सगळ्या ताली तीन महिने पाण्याखाली आहेत. सोमेश्वर मंदिराजवळील भगवान पिंगळे यांचे अडीच एकर सोयाबीन, तेवढाच घेवडा पूर्ण हातचा गेला आहे. पाणी साचल्याने केवळ एकशेवडी ऊस उभा आहे. त्यांच्या वस्तीवरील लोकांनाही गुरे डोंगरावरच चरायला न्यावी लागत आहेत. सोमनाथ सुतार, सुरेखा लकडे यांनी बाजरी सोडून दिली आहे तर ओढ्याशेजारील कांदा पीक पूर्ण वाहून गेले.