‘सोमेश्‍वर’च्या पदाधिकाऱ्यांचा ‘उत्तम’ पायंडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’च्या पदाधिकाऱ्यांचा ‘उत्तम’ पायंडा!
‘सोमेश्‍वर’च्या पदाधिकाऱ्यांचा ‘उत्तम’ पायंडा!

‘सोमेश्‍वर’च्या पदाधिकाऱ्यांचा ‘उत्तम’ पायंडा!

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : कारखान्याचे विविध प्रकारचे विस्तारिकारण सुरु असून, कर्जाचा भार वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कारखान्याच्या चारचाकी वाहने आज जमा केली. तसेच, गेस्ट हाऊस (अतिथिगृह) बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे महिन्याला सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांची बचत होणार आहे.
सोमेश्वर कारखान्याचे साखर युनिटचे विस्तारीकरण झाले आहे आणि आता सहवीजनिर्मिती व डिस्टिलरी युनिटचाही विस्तार होऊ घातला आहे. यातून भविष्यात हुकमी उत्पन्न वाढणार असले; तरी कर्जाचे आकडेही वाढणार आहेत. त्यामुळे आता गेस्ट हाऊस, अभ्यास दौरा अथवा गाड्या अशी कुठल्याही प्रकारची उधळपट्टी परवडणार नाही.
याबाबत सभासदांच्या भावना जाणून गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी काटकसरीचा उपाय म्हणून स्वतःपासून सुरवात करत कारखान्याचे चारचाकी वाहन जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. स्वतःचेच वाहन वापरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनीही आपले वाहन कारखान्याकडे जमा केले. संचालक मंडळाच्या सभेने यामध्ये आणखी भर घातली. अतिथिगृहाचाही महिन्याला किमान दोन लाखापेक्षा अधिक खर्च होत होता. आता अतिथिगृहाच्या भोजनगृहास टाळा ठोकण्यात आला.

वर्षाला होणार ५० लाखांची बचत
या निर्णयामधून किमान वर्षाला पन्नास लाख रुपये बचत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत सभासदांमधून कौतुक होत आहे. यापूर्वी कारखाना अडचणीत असताना पुरुषोत्तम जगताप यांनी सन २०१३ मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यावर वाहन त्यागले होते, तर अतिथिगृह बंद केले होते. तर, माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते यांनीही पदावर असताना स्वतःचेच वाहन वापरले होते. कै. वसंतकाका जगताप यांनी अध्यक्ष असताना दहा वर्ष सभासदांचा पैसा अत्यंत जपून वापरला होता. साखर विक्रीच्या सौद्यालाही ते डबा घेऊन जात आणि अत्यंत साध्या निवासगृहात राहत. त्यांची यानिमित्ताने आठवण होत आहे.

विस्तारिकारणाचा बोजा पाहता अधिकाधिक काटकसर करण्याच्या दृष्टीने अध्यक्षांच्या पुढाकाराने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उपाध्यक्ष वा संचालक मंडळाने त्यास साथ दिली.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक,
सोमेश्‍वर साखर कारखाना