ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना मदतीचा हात
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना मदतीचा हात

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना मदतीचा हात

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ६ ः ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हडपसरमधील कराटे खेळणाऱ्या तरुणाईने मदतीचा हात पुढे केला आहे. या तरूणांनी सोमेश्वर कारखाना (ता. बारामती) येथील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना कोप्यांवर येऊन शालेय साहित्य, खाऊ, खेळणी व जुनी कपडे याचे वाटप केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा अभ्यासवर्ग चालविला जातो. या कामाची माहिती हडपसरमधील कराटेपटूंना मागील वर्षी मिळाली होती. चालू वर्षी अभ्यासवर्ग सुरू होण्याआधीच शैक्षणिक साहित्य पोहोच करण्याचा निर्णय घेत हडपसरमधील शिवमुद्रा मार्शल आर्ट, चायनीज मार्शल आर्ट व वीरा मल्टीस्पोर्टस अकादमी या तीन संस्थांच्या कराटेपटूंनी जुन्या कपड्यांचे व खेळण्यांचे संकलन केले. तसेच शालेय साहित्य व खाऊ वर्गणीतून खरेदी केले. आज सोमेश्वर कारखान्याजवळील कोप्यांवर जाऊन त्यांनी कपडे, खेळणी, शालेय साहित्य व खाऊचे वाटप करत ऊसतोड मजुरांच्या मुलांचा आनंद व्दिगुणीत केला. तसेच या मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षक-कार्यकर्त्यांचा सत्कार करत त्यांना प्रेरणा दिली. ऊसतोड मजुराचा मुलगा कार्तिक लोखंडे हा टीव्हीवर नृत्याच्या कार्यक्रमात झळकल्याबद्दल त्याच्यासह गुरू योगेश ननवरे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शालाबाह्य मुलांसाठी कार्यरत असणारे शिक्षक अनिल चाचर, अमोल माने, तुषार पवार, विनोद कुंजीर, नवनाथ चोरमले, विवेक बरकडे, राहुल शिंदे, संभाजी खोमणे, संतोष होनमाने उपस्थित होते. नौशाद बागवान यांनी प्रास्ताविक केले. तर ज्ञानेश्वर पवार यांनी आभार मानले.
२१०९