पुण्याचा कोटा तुटपुंजा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याचा कोटा तुटपुंजा!
पुण्याचा कोटा तुटपुंजा!

पुण्याचा कोटा तुटपुंजा!

sakal_logo
By

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. १९ : केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी देशातील सर्वच कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. त्यानुसार एकूण साठ लाख टनांपैकी पुणे जिल्ह्यातील सोळा कारखान्यांना २ लाख ३९ हजार टन इतका तुटपुंजा कोटा आला आहे. यापैकी माळेगाव कारखान्याला सर्वाधिक अडीच लाख क्विंटलचा कोटा मिळाला आहे.

केंद्र सरकारने ३१ मेपर्यंत ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी खुली निर्यात पद्धत अवलंबिण्याऐवजी देशातील प्रत्येक कारखान्यास कोटा निश्चित करून दिला. मागील तीन वर्षांचे जे सरासरी साखर उत्पादन असेल, त्यापैकी १८.२३ टक्के साखर निर्यात करता येणार आहे. मात्र, निर्यात करू न शकणाऱ्या उत्तर प्रदेशास २१ लाख टन; तर महाराष्ट्राला अवघा २० लाख १३ हजार टनांचा कोटा मिळाला. त्यातून पुणे जिल्ह्यातील दहा सहकारी आणि सहा खासगी, अशा सोळा कारखान्यांना मिळून २३ लाख ९३ हजार क्विंटल (२ लाख ३९ हजार टन) कोटा मिळाला. मागील वर्षी एवढ्या कोट्याइतकी साखर केवळ सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती या तीन कारखान्यांनीच निर्यात केली होती. सरत्या हंगामात पुणे जिल्ह्याने १६ लाख ४७ हजार टन साखरनिर्मिती केली होती. चालू हंगामातही तेवढीच निर्मिती होणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हा ८ लाख टनापर्यंत साखरेची निर्यात करू शकतो. जागतिक बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३७०० ते ३८०० रुपयांवर गेले आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असताना सरकारकडून निर्यातीवर बंधने लादल्याने कारखान्यांना देशांतर्गत बाजारात ३३५० रुपये प्रतिक्विंटलनेच साखर विकावी लागणार आहे.

करार कमी दराने
निर्यात खुली राहील, या आशेने जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी आधीच ३३०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलने करार केले आहेत. आता थोडा कोटा शिल्लक आहे. छत्रपती कारखान्यातही कमी दराने करार आधी का केले, यावरून वाद-प्रतिवाद सुरू आहे. खुल्या निर्यातीचा निर्णय असता; तर ही वेळ कारखान्यांवर आली नसती.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने जाहीर केले आहे आणि त्यासाठी अर्थव्यवहारात कुठलेही निर्बंध नको, अशी भूमिका घेतली आहे. पण, एकीकडे मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे साखरेच्या निर्यातीवर बंधने लादायची, हे निर्यात धोरणातून दिसते.
-संजय खताळ, सचिव,
राज्य साखर संघ

देशातून साखर निर्यात करणार- ६० लाख टन
उत्तर प्रदेश कोटा- २१ लाख टन
महाराष्ट्र कोटा- २० लाख १३ हजार टन
पुणे जिल्ह्याचा कोटा- २ लाख ३९ हजार टन
पुण्यातून निर्यातीची क्षमता- ८ लाख टन

कारखानानिहाय निर्यात कोटा (क्विंटलमध्ये)
कारखाना निर्यात कोटा
माळेगाव २,५२,११०
सोमेश्वर २,४२,३१०
बारामती अॅग्रो २,२६,९७०
दौंड शुगर २,०९,४४०
विघ्नहर २,०१,८८०
भीमाशंकर १,९२,५३०
छत्रपती १,७०,२५०
इंदापूर १,३५,४८०
पराग अॅग्रो १,३२,२१०
व्यंकटेशकृपा १,१५,०००
संत तुकाराम १,१४,१००
म्हस्कोबा १,११,७७०
घोडगंगा १,०२,७१०
नीरा भीमा ८५,८८०
अनुराज ७५,५५०
राजगड २४,८४०

-----