
‘सोमेश्वर’कडून धूळफेक
सोमेश्वरनगर, ता. ३ : केंद्र सरकारचा १७ ऑगस्टचा एकरकमी ‘एफआरपी’चा आदेश डावलून सोमेश्वर कारखान्यासह जिल्ह्यातील कारखाने मागील राज्य सरकारच्या ‘एफआरपी’च्या परिपत्रकाचा अवलंब करत संपूर्ण एफआरपी देण्यात टाळाटाळ करत आहेत. सोमेश्वर कारखान्याची एफआरपी प्रतिटन २९०४ रूपये असताना २८०० रूपये देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केला. तसेच, केंद्राच्या आदेशानुसार संपूर्ण एफआरपी १० डिसेंबरपर्यंत व्याजासह द्यावी, अन्यथा काटा बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.
मागील राज्य सरकारने परिपत्रक काढून दोन टप्प्यात एफआरपी देण्याची शिफारस केली. या शिफारशीबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेलाच नाही. मात्र, परिपत्रकाच्या नावाखाली सोमेश्वर कारखान्यासह जिल्ह्यातील कारखाने संपूर्ण एफआरपीस टाळाटाळ करत आहेत. कोल्हापूर, सांगलीचे कारखाने संपूर्ण एफआरपी देत आहेत, असे मत काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘साखरेचे दर ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असून, सोमेश्वर कारखान्याकडे यानुसार १२० कोटी रुपयांची साखर उपलब्ध होत आहे. त्यामुळे एफआरपीची ८२ कोटी रक्कम त्वरीत देता येऊ शकते. परंतु, कारखाना ही रक्कम बिनव्याजी वापरत आहे. कृती समितीने एफआरपीच्या मागणीचे ‘सोमेश्वर’ला पत्र दिले आणि घाईघाईत २८०० रूपये प्रतिटन उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, प्रतिटन २९०४ रूपये एफआरपी १५ टक्के व्याजासह देणे सोमेश्वर कारखान्याला बंधनकारक आहे. उच्चांकी भाव दिला, कर्जेही थकलेली नाहीत, असे अध्यक्ष सांगतात; तसेच उपपदार्थांचे दरही दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे एकरकमी एफआरपीस अडचण नाही.’’
एफआरपी २९०४ रूपये प्रतिटन
केंद्र रकारने १७ ऑगस्टला एफआरपीची अधिसूचना काढत १०.२५ टक्के पायाभूत उताऱ्यास ३०५० रूपये एकूण एफआरपी द्यावी व पुढील प्रत्येक एक टक्का उताऱ्यास ३०५ रूपये द्यावेत, असे स्पष्ट केले. सोमेश्वर कारखान्याचा उतारा ११.९८५ टक्के आहे. १०.२५ टक्के उताऱ्याचे ३०५० आणि वरील १.७३ टक्के उताऱ्याचे ५२७.६५ रूपये होतात. त्यातून ६७४ रूपये तोडणी वाहतूक वजा जाता २९०३ रूपये ६५ पैसे म्हणजेच प्रतिटन २९०४ रूपये देय एफआरपी होत आहे, असे सतीश काकडे यांनी स्पष्ट केले.