वीजवाहक यंत्रणेत सुधारणा केल्यास टळतील मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजवाहक यंत्रणेत सुधारणा केल्यास टळतील मृत्यू
वीजवाहक यंत्रणेत सुधारणा केल्यास टळतील मृत्यू

वीजवाहक यंत्रणेत सुधारणा केल्यास टळतील मृत्यू

sakal_logo
By

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २१ : पुणे जिल्ह्यातील निगडे (ता. भोर) येथील चार शेतकऱ्यांचा वीजपंप नदीत नेत असताना वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेने जिल्हा हादरला असून पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वप्रथम वीजकंपनीने आपली वीजवाहक यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता तर आहेच शिवाय नागरिकांमध्येही उपकरणे हाताळताना काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारे अपघात, मृत्यू टळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

निगडे गावापाठोपाठ शेवगाव येथे वीजेची तार तुटून धक्का बसल्याने एक शेतमजूर आणि म्हैस ठार झाले. बीडचा रिल्स स्टार संतोष मुंडे व बाबाराव मुंडे हे शेतात फ्यूज बदलताना मृत्यूमुखी पडले. तीन-चार दिवसांतल्या या दुर्दैवी घटनांनी वीज सुरक्षा उपाय अवलंबणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते. वीजकंपनीच्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी अशा पध्दतीने दीड हजार लोक मृत्यूमुखी पडतात अथवा जायबंदी होतात. याशिवाय शॉर्ट सर्कीटने ऊस किंवा अन्य पिके पेटण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांकडे महावितरण कंपनी दुर्लक्षच करत असल्याचे दिसून येते. यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सध्याची काही ठिकाणची परिस्थिती
१. धोकादायक अवस्थेतेतील ट्रान्स्फॉर्मर
२. लोकवस्तीत, शेतात लोंबकळणाऱ्या तारा
३. झाडांमधून गेलेल्या वीज वाहक तारा
४. भ्रष्टाचारामुळे हलक्या दर्जाच्या तारा, खांब दर्जा


नागरिकही पैसे वाचविण्यासाठी साध्या कंपनीच्या केबल, तारा खरेदी करतात किंवा देखभाल दुरुस्तीसाठी दिरंगाई होते. विजेची उपकरणे हाताळताना साधे हँड ग्लोव्हज वापरतानाही दिसत नाहीत. केवळ वीजप्रवाह बंद करून कामे केली तरी अनेक प्राण वाचणार आहेत.
- लक्ष्मण लकडे, वीज तंत्रज्ञ

नागरिकांनी आर्थिंग व्यवस्थित करून घ्यावी. वीजकंपनीने जुन्या तारा बदलाव्यात. तारांना सर्वत्र स्पेसर टाकावेत. ट्रान्स्फॉर्मर नीटनेटके करावेत. आकडे कमी झाले आहेत. लोकांना त्रास न देता त्वरीत वीजकनेक्शन दिले तर आकडेही बंद होतील.
- बंडा शिंदे, वीज तज्ज्ञ

फ्यूज वीज वाहून नेण्यासाठी नव्हे वीज ब्रेक करण्यासाठी असतो. कुठे तारा चिकटल्या किंवा व्यक्ती, जनावर चिकटले तर फ्यूज उडून प्रवाह खंडित व्हायला हवा. परंतु तारा जाड टाकून फ्यूज जाणार नाही हे करता कामा नये. आकडे टाकण्यानेही अपघात वाढतात.
- नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता, वीजकंपनी, शिक्रापूर

यामुळे मृत्यूला आमंत्रण
१. वीजसंच मांडणीच चुकीची असणे
२. वीजसंचाची देखभाल न करणे
३. आकडे टाकून अथवा मीटरमधून वीजचोरी करणे
४. उपकरणे हाताळण्याबाबतचे अज्ञान अथवा बेफिकीरी
५. जॉइंट (जोड) मारून वीजप्रवाही केबल, तारा वापरणे
६. फ्यूजला कमी जाडीच्या तारा टाकणे

नागरिकांनी अशी घ्या काळजी
१. शासनमान्य विद्युत ठेकेदार/पर्यवेक्षक यांच्याकडूनच वीजसंच मांडणी करणे
२. विद्युत पुरवठा बंद करूनच काम करणे
३. रबरी हँड ग्लोव्हज वापरणे
४. पायात सेफ्टी शूज असावेत
५. निष्णात व्यक्तीकडूनच कामे करून घेणे
६.''आयएसआय'' मार्क वायर व उपकरणे वापरणे
७. तारांच्या संपर्कातील झाडे तोडण्यास मदत करणे

८. ट्रान्स्फॉर्मरसारख्या उच्चदाबाच्या यंत्रणेची हाताळणी टाळणे
९. फ्यूजच्या तारेच्या जाडीबाबत सतर्क राहणे
१०. आकडे न टाकणे

वीजकंपनीची जबाबदारी
* विद्युत संच मांडणी प्रामाणिकपणे तपासणे
* ट्रान्स्फॉर्मर, तारा, खांब यांचा दर्जा राखणे
* वीजसंचाचे वेळोवेळी निरीक्षण, देखरेख करणे
* फ्यूज, जंप यांची पाहणी करणे
* मागेल त्याला त्वरित, खांब व वीजजोड देणे
* झोळ आलेल्या तारांना स्पेसर टाकणे

सुरक्षेविषयी जागृती करणे गरजेचे
महावितरणने २०१३ पासून ११ ते १७ जानेवारी कालावधीत वीज सुरक्षा सप्ताह सुरू केला. मात्र केवळ सोपस्कर पार पाडले जातात. शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांचा सहभाग घ्यावा. पथनाट्य चर्चासत्रे, बॅनर, रॅली, होर्डिंग्ज, शालेय स्पर्धा अशा माध्यमातून सुरक्षेविषयी जागृती करणे अपेक्षित आहे.

1815515330, 1594135183, 1901754208