वाणेवाडी ग्रामपंचायत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाणेवाडी ग्रामपंचायत
वाणेवाडी ग्रामपंचायत

वाणेवाडी ग्रामपंचायत

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २१ : वाणेवाडी (ता. बारामती) येथे गावकारभाऱ्यांनी एकत्र येत उभारलेल्या पॅनेलला अपक्षांनी जोरदार धक्का दिला. गावकरी पॅनेलच्या विद्या सुनील भोसले यांचा अपक्ष उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी तब्बल ४०३ मतांनी धक्कादायक पराभव केला. तेरापैकी नऊ सदस्यांचे बहुमत गावकरी पॅनेलच्या पदरात पडले, ही मात्र दिलासादायक बाब ठरली. तर, मतदारांनी चार अपक्षही निवडून दिले आहे.
वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोधच्या परंपरेला यावेळी खीळ बसली. गावकारभाऱ्यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी संचालक किशोर भोसले, राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, उद्योजक सुनील भोसले व राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले, अॅड. नवनाथ भोसले अशा मातब्बरांची ताकद होती. या पॅनेलने विद्या सुनील भोसले यांना सरपंचपदाची उमेदवारी जाहीर केली. माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार गीतांजली जगताप यांनी कडवे आव्हान दिले. टप्प्याटप्प्याने गावकऱ्यांच्या हातून निवडणूक मतदारांच्या हातात गेली आणि सरपंचपदही निसटले. दुरंगी लढतीत पहिल्या प्रभागात विद्या भोसले यांनी मोठी आघाडी घेऊन आशा निर्माण केल्या, मात्र उर्वरित चारही प्रभागात गीतांजली जगताप यांनी निर्णायक मते प्राप्त केली.
सदस्यपदाच्या लढतीत मात्र हनुमान पॅनेलकडे सुरवातीलाच चार जागा बिनविरोध मिळाल्या. उर्वरित नऊ लढतीत अपक्षांनी कडवे आव्हान दिले. त्यापैकी पाच जागा हनुमान पॅनेलने; तर चार जागांवर अपक्षांनी विजयपताका फडकविली. यामध्ये रविराज जगताप या नवयुवकाकडून रामराजे सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष जगताप यांचा; तर धीरज चव्हाण यांच्याकडून माजी उपसरपंच गोपाळ चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. भाजपचे युवा कार्यकर्ते इंद्रजित भोसले व तृप्ती भोसले यांनाही पराभवास सामोरे जावे लागले.

विजयी उमेदवार- प्रभाग एक- वंदना संतोष चौगुले, अजितकुमार रामचंद्र भोसले, उजमा असिफ शिकिलकर. प्रभाग दोन- दीपाली मिलिंद सटाले, सतीश गोरख जगताप. प्रभाग तीन- रविराज तानाजीराव जगताप, वनिता नानासाहेब कोकरे. प्रभाग चार- धीरज संपत चव्हाण, सोनाली संतोष निकम, मंगल हरिश्चंद्र मुळीक. प्रभाग पाच- मयूरी सचिन पवार, रमेश घाडगे, शारदा भीमराव जाधव.