वर्दीच्या स्वप्नांना तांत्रिक चुकांचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्दीच्या स्वप्नांना तांत्रिक चुकांचे ग्रहण
वर्दीच्या स्वप्नांना तांत्रिक चुकांचे ग्रहण

वर्दीच्या स्वप्नांना तांत्रिक चुकांचे ग्रहण

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २३ : ‘‘मीरा-भाईंदरला १६०० मीटर धावताना ‘आरएफआयडी चीप’मुळे तांत्रिक अडचण आली. आठला पळालेलो, पण निकालासाठी तीनपर्यंत थांबवले. तक्रारी पण नीट ऐकून घेत नव्हते. तांत्रिक चुकीमुळे माझे गुण कमी होणार आहेत,’’ अशी व्यथा वेदांत शिंदे याने मांडली तर, ‘‘डोळं झाकून १२.५० टायमिंग काढतो, पण पुणे ग्रामीणला शंभर मीटरमध्ये माझं टायमिंग जास्त म्हणजे १३.९९ नोंदलंय. अपील केलं तर धमकावण्यात आलं. चार वर्ष सरावासाठी गरीब आईबाप पैसे पुरवत आहेत. आता आत्महत्या करायची वेळ आलीय,’’ अशी तक्रार विठ्ठल गिरी याने केली.
राज्य सरकारच्या अठरा हजार जागांसाठीच्या पोलिस भरतीसाठी बहुतांश ठिकाणी अद्ययावत पद्धतीने परीक्षा सुरळीत सुरू आहेत. मात्र, सर्वत्र आलेबल नाही, हे वरील घटनांवरून दिसते. इलेक्ट्रॉनिक संयत्राकडून (आरआयएफ चीप) धावण्याचे गुण मोजताना चुकाही होऊ शकतात. अशा चुकांबाबत अपील करणारास वाईट वागणूक दिली जात आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या कष्टकरी मुलांचे वर्दीचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. दरम्यान, पुणे, नाशिक, भंडारा अशा अनेक ठिकाणी रोजच्या रोज ऑनलाइन निकाल प्रसिद्ध होत आहेत. मात्र, मीरा-भाईंदरचे १३ नंतरचे निकाल अजूनही पडलेले नाहीत.
भोरचा वेदांत शिंदे म्हणाला, ‘‘१७ तारखेला मीरा-भाईंदरला टेबल नंबर पाचमध्ये आम्ही साठ जण होतो. गुण मोजताना तांत्रिक चूक झाल्याने तीनपर्यंत बसवलं. त्यानंतरही माझे टायमिंग ६ मी. २० सेकंद असताना ८ मी ३३ सेकंद दाखविल्याने वीसपैकी केवळ १२ गुण मिळाले. अपील केले, पण ‘आम्ही तुमचे नोकर नाही,’ असे म्हणत धावून आले. मीरा भाईंदरलाच शुक्रवारी परीक्षा देणारा शिरूरचा विद्यार्थी म्हणाला, ‘‘शंभर मीटरमध्ये १२.८५ सेकंद पडलंय. चीपमुळे एक, दोन सेकंद वाया जात आहेत. एकजण भांडला तर सगळ्यांनाच दीड तास बसवून ठेवलं.’’ चार वर्ष तयारीत घालवलेला सोलापूरचा विठ्ठल गिरी म्हणाला, ‘‘२१ तारखेला पुणे पोलिस ग्रामीणला दोन इव्हेंट उत्तम दिले. मात्र, शंभर मीटरला १२.५० टायमिंग डोळे झाकून काढतो, तिथं १३.९९ आलंय.’’

शंभर मीटरमध्ये १२.८० टायमिंग असते, पण १४.९९ इतके आलेय. अपील केल्यावर ‘अपात्र करू’ असं धमकावालं.
- दीपक मारकड, उमेदवार

गोरगरिबांची पोरं उराशी स्वप्न बाळगून रात्रीचा दिवस करत आहेत. पण, प्रशासनाच्या चुका स्वप्न धुळीस मिळवतील. गर्दीमुळे भरतीचा ताण आहे, पण शंकानिरसन तिथेच व्हावे.
- विक्रम बोंद्रे, करिअर मार्गदर्शक

‘लेखी तक्रारी करा’
मीरा भाईंदरचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे म्हणाले, ‘‘शिंदे या मुलाने जी वेळ सांगितली, ती चुकीची आहे. ऑनलाइन निकालाची प्रक्रियाही चालू आहे. मोठी संख्या असल्यामुळे वेळ लागतो. ते तपासून घेऊ. शंका असेल तर सनदशीर मार्गाने लेखी स्वरूपात तक्रार करावी. वरिष्ठांना सांगावे.’’