
‘सोमेश्वर’च्या ‘स्वीकृत’साठी फिल्डिंग!
सोमेश्वरनगर, ता. १० : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकांना पक्षश्रेष्ठींनी दिलेली एक वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे आधीच्या निवडींमध्ये डावलले गेलेल्या निष्ठावंतांचे नव्या निवडींकडे लक्ष लागले आहे. पक्षातील प्रमुखांकडे इच्छुकांनी फिल्डींग लावायलाही सुरवात केली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व २१ जागांवर एकतर्फी विजय मिळविला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी कृती समितीने एकत्र लढविलेल्या या निवडणुकीनंतर दोन स्वीकृत संचालक २९ जानेवारी २०२२ रोजी निवडले. यामध्ये काँग्रेसचे पुरंदरचे कार्यकर्ते तुषार माहूरकर व शेतकरी कृती समितीचे खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते अजय कदम यांना एक वर्षासाठी संधी देण्यात आली. २९ जानेवारी २०२३ रोजी त्यांची मुदत संपली आहे. अद्याप त्यांनी राजीनामे दिले नसल्याचे समजते. मात्र, दरवर्षी दोन नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी आधीच घेतलेली असल्याने इच्छुकांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
सहकार कायद्यानुसार संचालक मंडळ सहकार क्षेत्रातील दोन तज्ज्ञ व्यक्तींना ‘स्वीकृत तज्ज्ञ संचालक’ म्हणून निवडू शकते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पुरंदर, खंडाळा तालुक्याला संधी मिळाल्याने आता बारामती व फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. बारामतीतही जिराईत भागाला दोन संचालक दिले आहेत. त्यामुळे बागाईत भागात संधी मिळू न शकलेल्या राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांचा विचार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला मागील वर्षी थांबावे लागले होते. यावेळी मात्र कार्यकर्ते जोमात आहेत. आता आजपर्यंत ज्या गावांना कमी मतदारसंख्येमुळे प्रतिनिधित्वच मिळाले नाही, अशा गावातील कार्यकर्त्यांनाही डोहाळे लागले आहेत.
कामगार संचालकाशिवाय कारभार
सोमेश्वर कारखान्याच्या साखर कामगार संघटनांमध्ये दोन गट आहेत. कोणत्या गटाला पहिल्यांदा संधी द्यायची, या वादात निवडणूक होऊन दीड वर्ष झाले, पण कामगार संचालक (कार्यलक्षी संचालक) नेमण्यात आलेला नाही. कामगार संचालकाशिवाय कारभार सुरू असल्याने आता नव्या ‘स्वीकृत’ निवडींसोबत कामगार संचालकाचाही निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे.