शिक्षक बदल्यांत सेवाज्येष्ठांवर अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बदल्यांत सेवाज्येष्ठांवर अन्याय
शिक्षक बदल्यांत सेवाज्येष्ठांवर अन्याय

शिक्षक बदल्यांत सेवाज्येष्ठांवर अन्याय

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २२ : राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात दुर्गम (अवघड) भागातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये बहुतांश शिक्षक पन्नाशी ओलांडलेले आहेत. या बदल्या सेवाज्येष्ठांवर अन्यायकारक ठरणार आहेत, अशी भूमिका प्राथमिक शिक्षक संघाचे (संभाजीराव थोरातप्रणित) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी मांडली.
राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेचे चार टप्पे सुरळीत पार पडले आणि बहुतांश शिक्षकांसाठी ते समाधानकारक ठरले. आताचा शेवटचा टप्पा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यस्तरीय अभ्यासगटाने आखलेल्या बदली धोरणानुसार बदलीच्या सुरवातीला रिक्त जागांचे समानीकरण केले होते. परंतु, बदल्याचे चार टप्पे झाल्यानंतर पुन्हा भोर, वेल्हे, मुळशी आदी दुर्गम तालुक्यांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढली आहे. अशा रिक्त जागांसाठी १०० पदवीधर व १७४ उपशिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे.
याबाबत मारणे व खंडेराव ढोबळे म्हणाले, ‘‘दिव्यांग, आजारी व ५३ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी बदलीस प्राधान्य मिळावे म्हणून ‘संवर्ग १’ तयार केला आहे. त्याला बदलीतून सूट अथवा ऐच्छीक बदली दिली जाते. मात्र, यावर्षी ५३ वर्षे पूर्ण असणाऱ्या ज्या शिक्षकांनी बदलीस नकार नोंदवला नाही, अशांनाही अवघड भागात जाण्याची वेळ आली आहे. यादीमध्ये निवृत्तीला १ वर्ष बाकी असलेले, ज्येष्ठ महिला, आजारी शिक्षकांचा समावेश आहे. अवघड क्षेत्राच्या नावाखाळी मोठ्या शाळांवरील शिक्षक काढून कमी पटसंख्येच्या शाळांवर पाठवण्याच्या या प्रकाराने शिक्षणाचा बोजवारा उडणार आहे. सदर जागा आंतरजिल्हा बदलीतून भराव्यात.

बदल्या नियमांनुसारच : शिक्षणाधिकारी
याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड म्हणाल्या, ‘‘राज्य सरकारच्या अभ्यासगटाने आखलेल्या धोरणानुसार अॅपद्वारे पारदर्शक पद्धतीने बदल्या होत आहेत. सेवाज्येष्ठ शिक्षकांना बदलीतून सवलत मागण्याचा अधिकार होता. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी बदलीस होकार दिला आहे किंवा नकार दिलेला नाही, अशा शिक्षकांना रिक्त जागांवर पाठविण्यात येणार आहे. यादी अंतिम झाली असून, शासन निर्णयानुसारच काम करत आहोत.’’

यादीत पन्नास टक्के ज्येष्ठ महिला, व्याधीग्रस्त शिक्षकही आहेत. त्यांच्याबाबत सहानुभूतीचे धोरण ठेवावे, यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दाद मागणार आहोत. ज्यांनी बदलीस होकार अथवा नकारही दिला नाही, त्यांचाही यादीत समावेश झाल्याने खळबळ उडाली आहे. एप्रिलनंतरच बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागणार आहे. तोपर्यंत शासनाने रिक्त जागा शिक्षण सेवक भरतीतून भराव्यात.
- केशवराव जाधव, अध्यक्ष,
राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटीलप्रणित)